संरक्षण मंत्रालय
नवी दिल्ली येथे तिन्ही सैन्यदलांच्या ‘परिवर्तन चिंतन’ शिबिराचे आयोजन
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सशस्त्र दलांची संयुक्त संस्कृती विकसित करण्यावर दिला भर
Posted On:
08 APR 2024 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2024
नवी दिल्ली येथे आज 08 एप्रिल 2024 रोजी तिन्ही सैन्य दलांच्या ‘परिवर्तन चिंतन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशातील सशस्त्र दलांमध्ये संयुक्तता आणि एकात्मता अधिक वाढवण्यासाठी नव्या आणि ताज्या दमाच्या संकल्पना, उपक्रम आणि सुधारणा यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने विचारमंथन तसेच संकल्पना मननविषयक चर्चात्मक उपक्रमाच्या रुपात हे ‘चिंतन’ शिबीर आयोजित करण्यात आले. “भविष्यकाळासाठी सुसज्ज” होण्याच्या हेतूने भारतीय सशस्त्र दले ज्या संयुक्त संरचनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्या परिवर्तनाचे संयुक्तता आणि एकात्मता हे आधारस्तंभ आहेत.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या तिन्ही सेनादलांच्या आगळेपणाचा आदर करतानाच पारंपरिक संकल्पनांना नवा आयाम देण्यासाठी प्रत्येक दलातील सर्वोत्तम गोष्टींचा समावेश करणारी संयुक्त संस्कृती विकसित करण्याच्या गरजेवर अधिक भर देऊन ‘चिंतन’ शिबिराची सुरुवात केली. सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या आणि आपल्या लढाऊ क्षमतेत तसेच आंतरपरिचालन क्षमतेत वाढ करणाऱ्या संरचना उभारुन प्रत्येक दलाच्या क्षमता एकत्रित करण्यावर देखील त्यांनी भर दिला.
अंदमान आणि निकोबार कमांड आणि धोरणात्मक दल कमांड, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, संरक्षण व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानविषयक लष्करी संस्था यामधील जवान तसेच सशस्त्र दलांचा विशेष मोहीम विभाग, संरक्षण दलातील अवकाश संस्था, संरक्षण दलांची सायबर संस्था तसेच संरक्षण दूरसंवाद विभाग यांचे प्रमुख देखील तिन्ही सेनादलांच्या या परिषदेला उपस्थित होते. मुख्यालय एकात्मिक संरक्षण दल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे विचारमंथन शिबीर आयोजित केले होते.
तिन्ही सैन्यदले तसेच मुख्यालय आयडीएस यांतील विविध अनुभवसंपन्न अधिकाऱ्यांनी देखील यावेळी उपस्थित राहून चर्चेत भाग घेतला आणि उदयोन्मुख तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच आधुनिकीकरण, खरेदी, प्रशिक्षण, स्वीकार आणि सहयोगी संबंध यांच्याशी संबंधित अत्याधुनिक सुधारणांची सुरुवात करण्याच्या संदर्भात संकल्पना सुचवून योगदान दिले. नागरी आणि लष्करी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित राष्ट्रीय धोरणात्मक मुद्द्यांबाबतच्या माहितीवर चर्चा देखील करण्यात आली.
अशा प्रकारचे संवादात्मक उपक्रम आपल्या सैन्यदलांना भविष्यासाठी सुसज्ज भारतीय सशस्त्र दलांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी संयुक्त परिचालनात्मक संरचना म्हणून उदयाला आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे पुरवतील असे मत एकात्मिक संरक्षण कर्मचारी वर्ग प्रमुखांचे अध्यक्ष, कर्मचारी समित्यांचे प्रमुख (सीआयएससी) लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांनी त्यांच्या समारोपपर भाषणात व्यक्त केले.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017462)
Visitor Counter : 106