उपराष्ट्रपती कार्यालय
नैतिक नेतृत्व मूल्यांसोबत तडजोड करणारे असू शकत नाही - उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
Posted On:
07 APR 2024 4:46PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नेतृत्वाच्या मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि मोहाला बळी न पडण्याचा आणि अनैतिक शॉर्टकट्सचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. “ नैतिक नेतृत्व कधीही मूल्यांसोबत तडजोड करणारे नसते, मूल्यांसोबत केलेली तडजोड तुम्हाला कधीही असा विजेता बनवू शकत नाही ज्याच्यासमोर संपूर्ण जग नतमस्तक होईल”, असे ते म्हणाले.
ते आज बोधगया येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (IIM) 6 व्या पदवीदान समारंभात बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना देशाच्या भविष्याची जबाबदारी वाहणारे वाहक म्हणून असलेल्या त्यांच्या भूमिकेची जाणीव करून दिली. “कायद्याच्या राज्याचे जिथे काटेकोर आणि काळजीपूर्वक पालन होते अशा समाजाचे अग्रणी आणि सद्भावना दूत बनण्याचे मी तुम्हाला आवाहन करत आहे”, असे त्यांनी सांगितले.
देशाची समृद्धी आणि सार्वभौमत्व यासाठी आर्थिक राष्ट्रवादाचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपतींनी नागरिकांना स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल ही एक राष्ट्रीय सवय व्हावी, असे आवाहन केले. असे केल्यामुळे आपल्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये लक्षणीय सकारात्मक योगदान मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि उद्योजकतेची जोपासना होईल, यावर धनखड यांनी भर दिला.
जागतिक उलथापालथीमध्ये भारताच्या उंचावणाऱ्या आर्थिक कक्षेकडे लक्ष वेधत उपराष्ट्रपतींनी नमूद केले की जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उजळत गेल्यामुळे आपली राष्ट्रीय भावनाही वृद्धिंगत झाली आहे. पोषक परिसंस्था आणि नवीन दालनांच्या उपलब्धतेवर भर देत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता आणि कौशल्य यांचा वापर भारताच्या विकासगाथेचे नवे अध्याय लिहिण्यासाठी करण्यास प्रोत्साहित केले.
क्वांटम कंप्युटिंग, मशीन लर्निंग, 6 जी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध आघाड्यांवर भारताचे आघाडीचे स्थान अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी सध्याच्या तरुणाईला उपलब्ध असलेल्या 'सोन्याच्या खाणींसारख्या संधीं'चे महत्त्व अधोरेखित केले. त्यांना नेहमीच्या पारंपरिक विचारसरणीतून बाहेर पडण्याचे आणि चाकोरीच्या बाहेरचा विचार करण्याचे आवाहन करताना धनखड म्हणाले, " स्टार्ट अप परिसंस्था अगणित संधी देत असल्यामुळे तुम्हाला कधीही नव्या संकल्पनांची कमतरता भासणार नाही याची खात्री बाळगा."
बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर, आयआयएम बोधगयाचे अध्यक्ष उदय कोटक, नीती आयोगाचे माजी सीईओ आणि भारताचे जी20 शेर्पा अमिताभ कांत, आयआयएम बोधगयाच्या संचालक डॉ. विनिता सहाय आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2017373)
Visitor Counter : 137