संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाकडून 27 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका; बांगलादेश तटरक्षक दलाकडे केले सुपूर्द

Posted On: 05 APR 2024 7:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2024

भारतीय तटरक्षक दलाने 4 एप्रिल 24 रोजी केलेल्या गोपनीय कारवाईत समुद्रात मासेमारी नौकेवर अडकलेल्या 27 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली. दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11. 30 वाजता, भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेवर गस्तीदरम्यान भारतीय तटरक्षक जहाज अमोघला, भारतीय सागरी हद्दीत आलेली बांगलादेशी मासेमारी नौका  सागर II दिसली. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाद्वारे तपासासाठी एक पथक पाठवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून बोटीचे स्टीयरिंग गियर खराब झाले होते आणि तेव्हापासून ती नौका वाहून भारतीय सागरी हद्दीत आल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. या जहाजात 27 नाविक/मच्छीमार होते.

भारतीय तटरक्षक दलाच्या तांत्रिक पथकाने दोष ओळखून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु नौकेचे सुकाणू पूर्णपणे खराब झाल्याचे निदर्शनास आले आणि समुद्रात दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. समुद्राची स्थिती आणि हवामान अनुकूल असल्याने, भारतीय तटरक्षक दल आणि बांगलादेश तटरक्षक दलादरम्यानच्या सामंजस्य करारानुसार (एमओयू), संकटग्रस्त नौका भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीकडे नेऊन त्या हद्दीवर कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या बांगलादेशी मासेमारी नौकेकडे किंवा बांगलादेश तटरक्षक दलाच्या जहाजाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यादरम्यान कोलकाता येथील भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाने बांगलादेश तटरक्षक दलाशी संवाद साधून त्यांना घटनेची आणि कारवाईच्या योजनेची माहिती दिली. बांगलादेश तटरक्षक दलाचे जहाज (बीसीजीएस) कमरुझ्झमान हे बीएफबीच्या टोइंगसाठी बीसीजी ने तैनात केले होते. बीसीजी जहाज कमरुझ्झमान 4 एप्रिल 24 रोजी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सागरी हद्दी जवळ आले. आयसीजीएस अमोघने 27 बांगलादेशी मच्छिमारांना त्यांच्या नौकेसह बीसीजी जहाज कमरुझ्झमनकडे सुपूर्द केले.

ही कारवाई भारतीय तटरक्षक दलाची समुद्रातील अनमोल जीवांचे रक्षण करण्याप्रति बांधिलकी प्रतिबिंबित करते. अशा यशस्वी शोध आणि बचाव कार्यांमुळे केवळ प्रादेशिक एसएआर संरचना मजबूत होणार नाही तर शेजारील देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील वाढेल. हे भारतीय तटरक्षक दलाच्या "वयम रक्षामह" म्हणजेच "आम्ही संरक्षण करतो" या ब्रीदवाक्याला अनुसरून आहे.

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017275) Visitor Counter : 67