संरक्षण मंत्रालय
लष्करी वैद्यकीय विभागाचा 260 वा स्थापनादिन साजरा
Posted On:
04 APR 2024 2:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2024
लष्करी वैद्यकीय विभागाने(एएमसी) काल, 03 एप्रिल 2024 रोजी 260 वा स्थापनादिन साजरा केला. वर्ष 1764 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या विभागाने अनेक दशके युद्धाचे वातावरण तसेच शांततामय परिस्थिती अशा दोन्ही काळात प्रगती, विकास, समर्पणभाव आणि त्यागाने परिपूर्ण अशी निस्वार्थ देशसेवा करून, ‘सर्वे सन्तु निरामयः’ म्हणजेच ‘सर्वांना निरोगी आयुष्य लाभो’ हे विभागाचे ब्रीदवाक्य सार्थ करून दाखवले आहे.
हा स्थापनादिन साजरा करण्यासाठी तसेच एएमसीच्या यशाचा सन्मान करून या विभागात कार्यरत असणाऱ्यांची परस्पर निष्ठा आणि अभिमान साजरा करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी भाग घेतला. याप्रसंगी, लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या अतुलनीय कामगिरीचे दर्शन घडवणाऱ्या व्हिडीओचे देखील सादरीकरण करण्यात आले आणि त्याचा लाभ एएफएमएसचे 700 हून अधिक ज्येष्ठ कर्मचारी तसेच नागरी आणि इतर सेवा विभागातील अनेक मान्यवरांनी घेतला.
लष्करी वैद्यकीय विभागातील हजारो अधिकारी, जेसीओज आणि इतर श्रेणींतील कर्मचारी यांनी सशस्त्र दलांतील कर्मचारी, त्यांची कुटुंबे तसेच निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी बजावलेल्या यशस्वी सेवेच्या योगदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी एएमसी स्थापनादिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भातील मोहिमा तसेच एचडीएआर अर्थात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्याचा भाग म्हणून एएमसीने परदेशी भूमीवर वैद्यकीय सेवेच्या प्रत्येक क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.
युध्दकाळात सर्वोच्च पातळीवरील वैद्यकीय सेवा तसेच शांतताकाळात सर्वोकृष्ट अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवण्यात सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न करत एएमसीने 260व्या स्थापनादिनानिमित्त कर्तव्याच्या पलीकडे जाऊन व्यावसायिकता, धैर्य आणि दयाभाव यांचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.हे करतानाच विभागाने ‘स्वस्थ भारत, विकसित भारत’ निर्माण करण्याच्या अंतिम ध्येयाच्या दिशेने अथक वाटचाल देखील सुरु ठेवली आहे.
N.Meshram/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017148)
Visitor Counter : 99