आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने myCGHS iOS ॲपचे केले अनावरण
Posted On:
03 APR 2024 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2024
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण केले. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांच्या आरोग्य विषयक इलेक्ट्रॉनिक नोंदी, माहिती आणि स्रोत याबद्दलची माहिती सहज उपलब्ध व्हावी या दृष्टीने या ॲपची रचना करण्यात आली आहे.
या ॲपचे अनावरण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की myCGHS ॲप हे आरोग्य देखरेख सेवांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या क्षेत्रात घेतलेली एक मोठी झेप आहे. या ॲप मुळे आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांना आरोग्यसेवांबद्दलची अत्यावश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकेल. हा उपक्रम आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”
myCGHS iOS ॲप राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एन आय सी) हिमाचल प्रदेश आणि एन आय सी आरोग्य टीमच्या तांत्रिक संघांनी विकसित केले आहे. सीजीएचएस लाभार्थ्यांसाठी माहिती आणि सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने सुविधा देणारे हे एक सोयीस्कर मोबाइल ॲप्लिकेशन आहे.
myCGHS ॲप ऑनलाइन भेटीसाठी वेळ घेणे किंवा रद्द करणे, सी जी एच एस कार्ड आणि इंडेक्स कार्ड डाउनलोड करणे, सी जी एच एस प्रयोगशाळेमधून प्रयोगशाळांचे अहवाल घेणे, औषधांचा इतिहास तपासणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्याची स्थिती तपासणे, रेफरल तपशील बघणे, जवळील आरोग्य केंद्र शोधणे बातम्या आणि ठळक घडामोडींची अद्ययावत माहिती संकलित करणे, जवळपासची सूचिबद्ध रुग्णालये, प्रयोगशाळा आणि दंत चिकित्सा दवाखाने शोधणे आणि निरामयता केंद्रे आणि कार्यालयांचा संपर्क तपशील सहज उपलब्ध करणे, यासह विविध सेवांची सुविधा प्रदान करते.
या ॲपमध्ये द्विस्तरीय प्रमाणीकरण आणि mPIN ची कार्यक्षमता यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जी वापरकर्त्यांच्या माहितीची गोपनीयता आणि सत्यता सुनिश्चित करतात.
हा उपक्रम सी जी एच एस विभागातील डिजिटल आरोग्यसेवेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. myCGHS ॲप आता iOS आणि Android या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून मोफत डाउनलोड करता येऊ शकेल. सी जी एच एस लाभार्थ्यांना सुगम्य आरोग्य सेवेचा अनुभव घेण्यासाठी अभिनव तंत्राचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017084)
Visitor Counter : 148