आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ मनसुख मांडवीया यांनी उन्हाळ्याशी संबंधित आजारांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सज्जतेचा घेतला आढावा


प्रभावी व्यवस्थापनात प्रभावी उपाययोजनेचे महत्व लक्षात घेऊन उष्णतेच्या लाटेच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज: डॉ मांडवीया

Posted On: 03 APR 2024 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2024

 

"उष्णतेच्या लाटेच्या सुयोग्य व्यवस्थापनाकरिता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे कारण प्रभावी उपाययोजनेद्वारे  प्रभावी व्यवस्थापन होते" असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया  यांनी केले. उष्णतेशी संबंधित आजाराच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली, त्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल, हे देखील उपस्थित होते.

क्षेत्रीय स्तरावर अचूक डेटाचा अभाव अधोरेखित करताना, परिस्थितीचे वास्तववादी मूल्यांकन करता येण्यासाठी डॉ. मांडवीय यांनी उष्णतेच्या लाटेबाबतची इत्यंभूत माहिती तसेच उष्माघातामुळे मृत्यूच्या नोंदीसह क्षेत्रीय पातळीवरील डेटा सामायिक करण्यासाठी राज्यांकडून प्राप्त माहितीसह केंद्रीय डेटाबेस तयार करण्याचे महत्त्व नमूद केले. राज्यांना भारतीय हवामान खात्याद्वारे इशारा प्राप्त झाल्यावर वेळेवर कृती  करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला.

उष्णतेच्या विकारांच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी सहयोगी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक चांगला समन्वय साधून परिस्थितीच्या आकलनासाठी राज्यांसोबत बैठक घेण्याची सूचना केली.

लोकांमध्ये माहिती आणि जनजागृती मोहिमेसाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यावर डॉ. भारती प्रवीण पवार यांनी भर दिला. आयुष्मान आरोग्य मंदिरांना वॉटर कुलर, आइस पॅक आणि इतर मूलभूत गरजांनी सुसज्ज करण्याचे महत्त्व त्यांनी नमूद केले. उष्णतेच्या लाटांच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी राज्यांनी राज्य कृती आराखड्याच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीला गती देण्याची गरजही त्यांनी विशद केली.

राज्य स्तरावर पालन केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांच्या तपासणी सूचीची खातरजमा करण्याचे महत्त्व डॉ. व्ही के पॉल यांनी नमूद केले. वेबिनार आणि इतर पद्धतींद्वारे उपचार मानक प्रणालीबाबत जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला. उष्णतेशी संबंधित प्रकरणे आणि आजारांबाबत प्रत्येक राज्यातील डेटाचे संकलन करण्यावरही त्यांनी भर दिला.

23 राज्यांमध्ये उष्मा कृती योजना अद्ययावत करण्यात आल्या आहेत तर सुमारे 100 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कृती मोहीम सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. उष्माघाताची प्रकरणे आणि मृत्यूंच्या नोंदीबाबत मानक प्रणाली; आणि उन्हाळी हंगामापूर्वी आणि त्यादरम्यान सज्जतेची योजना, संवेदनशील विभागांमध्ये उष्णता विकारांवर विशेष भर देण्यात आला.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व मुख्य सचिवांना एक मार्गदर्शक सूचना  जारी केली असून त्यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचे राज्यांना पालन करण्याची विनंती करण्यात आली असल्याबाबत अवगत करण्यात आले. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे (एनसीडीसी) सामान्य लोक तसेच वंचित लोकांसाठी उन्हाळ्याच्या महिन्यांत काय करावे आणि करू नये याचीही माहिती देण्यात आली आहे.

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017081) Visitor Counter : 57