संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी महासंचालनालय (डीजीक्यूए) च्या पुनर्रचनेसाठी अधिसूचना जारी केली


पुराव्यांचे श्रेणी आणि चाचणी सुविधांचे पारदर्शक वाटप सुलभ करण्यासाठी,संरक्षण चाचणी आणि मूल्यमापन प्रोत्साहन संचालनालय कार्यरत होणार

Posted On: 28 MAR 2024 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 28 मार्च 2024

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील 'व्यवसाय सुलभता' आणि 'आत्मनिर्भरता' या ध्येयदृष्टीच्या अनुषंगाने संरक्षण मंत्रालयाच्या, संरक्षण उत्पादन विभागाने, गुणवत्ता हमी महासंचालनालय (डीजीक्यूए) च्या पुनर्रचनेची अधिसूचना जारी केली. त्यामुळे चाचण्या तसेच गुणवत्ता हमी प्रक्रियेला वेग येईल आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील स्तर देखील कमी होतील.या पुनर्रचनेमुळे गुणवत्ता हमी पद्धतीमधील घटकांमध्ये तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) अर्थात आयुध निर्माण मंडळाच्या कॉर्पोरेटायजेशन नंतर डीजीक्यूए च्या सुधारित भूमिकेत परिवर्तन होईल

आयुध निर्माण कारखान्याचे संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कॉर्पोरेटायजेशन झाल्याने खाजगी क्षेत्रातील संरक्षण उद्योगांचा सहभाग वाढला त्याचबरोबर केंद्र सरकारने स्वदेशी उत्पादनांना चालना दिली, या सर्वांचा परिणाम म्हणून उदयोन्मुख संरक्षण कारखानदारी उद्योगाला यथायोग्य पाठिंबा देण्याच्या उद्देशाने डीजीक्यूए ची पुनर्रचना करण्याची आवश्यकता भासू लागली.संरक्षण उत्पादन परिसंस्थेतील सर्व भागधारकांशी विस्तृत विचारविनिमय केल्यानंतर डीजीक्यूए आधीच विविध संस्थात्मक आणि कार्यात्मक सुधारणांचे संचालन करत आहे.

या नवीन आराखड्याची अंमलबजावणी झाल्यानंतर संपूर्ण उपकरण / शस्त्र संबंधित मंचासाठी एका पातळीवर एकल बिंदू तांत्रिक पाठिंबा देणे शक्य होईल आणि उत्पादन आधारित गुणवत्ता हमीसाठी एकसमानता सुनिश्चित होईल. नवीन संरचनेत  प्रूफ श्रेणी आणि चाचणी सुविधांचे पारदर्शक वाटप सुलभ करण्यासाठी, स्वतंत्र संरक्षण चाचणी आणि मूल्यमापन प्रोत्साहन संचालनालयाची तरतूद आहे

प्रमाणित गुणवत्ता हमी प्रक्रियांचे स्वयंचलन आणि डिजिटायझेशन केल्यामुळे डीजीक्यूए बरोबरच्या संरक्षण उद्योगाच्या सहभागामध्ये उल्लेखनीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. पुनर्रचित संरचना आणि सध्या सुरु असलेल्या कार्यात्मक सुधारणामुंळे आत्मनिर्भर भारत या ध्येयदृष्टी अंतर्गत स्वदेशीकरण मोहिमेला चालना मिळेल आणि देशातील उत्पादकांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय मानके/ किंवा समतूल्य मानके उपलब्ध असतील आणि यामुळे उच्च दर्जाच्या पात्र  संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीलाही चालना मिळेल.

N.Meshram/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016589) Visitor Counter : 101