श्रम आणि रोजगार मंत्रालय
ब्रासिलिया येथे जी 20 दुसऱ्या रोजगार कार्य गटाच्या बैठकीत भारत सहभागी
Posted On:
27 MAR 2024 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 27 मार्च 2024
ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय रोजगार कार्य गट बैठक आज ब्रासिलिया येथे सुरू झाली. सर्वांसाठी मजबूत, शाश्वत, संतुलित आणि रोजगार समृद्ध विकासासाठी श्रम, रोजगार आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे हा जी 20 रोजगार कार्य गटाचा उद्देश आहे.भारत हा जी 20 ट्रोइकाचा सदस्य असून त्याचे प्रतिनिधित्व कामगार आणि रोजगार सचिव सुमिता डावरा करत आहेत. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसह दुसऱ्या रोजगार कार्य गटाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भारत भूषवत आहे. या बैठकीसाठी उपस्थित भारतीय शिष्टमंडळात सहसचिव रुपेश कुमार ठाकूर आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे उपसंचालक राकेश गौर यांचाही समावेश आहे.
उद्घाटन सत्राची सुरुवात ब्राझीलचे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री लुईझ मारिन्हो यांच्या भाषणाने झाली. यानंतर,ब्राझिलिया येथील दुसऱ्या रोजगार कार्य गटाचे प्राधान्य क्षेत्र भारताच्या अध्यक्षपदासह मागील जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत असलेल्या प्राधान्य क्षेत्र आणि फलिताशी संरेखित होते,असे सुमिता डावरा यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला नमूद केले. कार्य क्षेत्रात चिरस्थायी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी बहु-वर्षीय कार्यसूचीमध्ये सातत्य ठेवण्याची त्यांनी प्रशंसा केली.हे केवळ शाश्वत नाही तर रोजगार कार्यगटाने भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात सुरू केलेल्या कार्यालाही अधिक उंचावते.असे त्या म्हणाल्या.
(i)दर्जेदार रोजगार निरंतर करणे आणि साजेशा श्रमांना प्रोत्साहन देणे; (ii) डिजिटल आणि उर्जा परिवर्तनांमध्ये न्याय्य संक्रमणाला प्रोत्साहित करणे;
(iii)सर्वांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे; (iv) स्त्री पुरुष समानता वाढवणे आणि रोजगाराच्या जगात सर्वसमावेशकता, नवोन्मेष आणि विकासासाठी विविधतेला प्रोत्साहन देणे यावर दुसऱ्या रोजगार कार्यगटाच्या बैठकीसाठी भर देण्यात आला आहे.
बैठकीच्या पहिल्या दिवशी स्त्री पुरुष समानतेचा प्रचार आणि कार्यस्थळी विविधतेला चालना देण्याच्या अत्याधुनिक संकल्पनेवर चर्चा झाली. भारतीय शिष्टमंडळाने वंश, लिंग, वांशिक किंवा सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी समान प्रतिनिधित्व आणि सक्षमीकरण सुनिश्चित करून सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला.
भारतीय शिष्टमंडळाने,(i) कामाच्या ठिकाणी आणि त्यापलीकडे स्त्री पुरुष समानता; (ii) स्थलांतरित कामगारांसाठी उचललेली पावले; (iii) ज्येष्ठ नागरिकांच्या पुनर्रोजगाराला प्रोत्साहन देणे, (iv) दिव्यांग आणि दुर्लक्षित लोकांचा मनुष्यबळामध्ये सहभाग या संदर्भात, भारताने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीची माहिती दिली
बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रोजगार कार्य गटाच्या बैठकीत चर्चेसाठी अजेंडा पुढे नेला जाईल.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016527)
Visitor Counter : 89