संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्कराचे कमांडर्स देशाच्या सर्वांगीण सुरक्षेचा आढावा घेणार, अनेक मुद्यांवर होणार विचारमंथन

Posted On: 27 MAR 2024 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 27 मार्च 2024

लष्कराच्या कमांडर्सची वर्ष 2024 साठीची पहिली बैठक मिश्र पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. दूरदृश्य पद्धतीने 28 मार्च 2024 रोजी आणि त्यानंतर नवी दिल्ली येथे 1 आणि 2 एप्रिल  2024रोजी प्रत्यक्ष, अशी ही बैठक नियोजित आहे. परिषदेला  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संबोधित करतील आणि परिषदेदरम्यान वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी ते संवाद साधतील. ही परिषद भारतीय लष्कराच्या शीर्ष नेतृत्वासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्याचा तसेच देशाच्या सर्वांगीण सुरक्षेचा आढावा आणि मूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण मंच ठरते. भविष्याची दिशा ठरवण्यात महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांसाठी प्राधान्यक्रम ही परिषद निर्धारित करेल.

दिनांक 28 मार्च 2024 पासून सुरू होणाऱ्या या परिषदेचे अध्यक्षस्थान नवी दिल्लीत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे भूषवतील आणि लष्करी कमांडर्स आपापल्या कमांड मुख्यालयातून आभासी पद्धतीने सहभागी होतील. क्षेत्रीय सेना आणि माजी सैनिकांच्या कल्याणावर परिणाम करणाऱ्या  मुद्यांवर यावेळी चर्चा होईल.  राष्ट्रीय सुरक्षेसाठी निर्माण होत असलेल्या भूराजकीय स्थितीवर  आणि संभाव्य परिणामांवर प्रतिष्ठित विषय तज्ज्ञांद्वारे चर्चादेखील केली जाईल.

प्रत्यक्ष पद्धतीने 1 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या परिषदेत लष्कराचे शीर्ष नेतृत्व विचारमंथन सत्रांमध्ये सहभागी होतील. कार्यात्मक परिणामकारकता वाढवणे, नवोन्मेष आणि अनुकूलनक्षमतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन आणि भविष्यातील आव्हानांसाठी तत्परता  सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे, हे या सत्रांचे उद्दिष्ट असेल. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने  सैन्यकर्मींच्या कल्याणाशी संबंधित मुद्यांचा समावेश या विचारमंथन सत्रात असेल. लष्करप्रमुखांच्या  अध्यक्षतेखाली आर्मी ग्रुप इन्शुरन्सच्या गुंतवणूक सल्लागार समितीची बैठक  होईल.  आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ या बैठकीला उपस्थित राहतील. ही समिती सेवारत सैनिक, माजी सैनिक  आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक सुरक्षेसाठी विविध कल्याणकारी उपाय आणि योजनांवर विचारविनिमय करेल.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे बीजभाषण  2 एप्रिल 2024 रोजी होईल. लष्करातल्या वरिष्ठ स्तराला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी संबोधित करतील. संरक्षण सचिव आणि संरक्षण मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी  उपस्थित राहतील. आपल्या विस्तृत व्याप्तीसह लष्कराच्या कमांडर्सची ही परिषद भारतीय लष्कर प्रगतिशील, दूरदर्शी, कुठल्याही परिस्थितीवर मात करण्यास सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज राहील, याची सुनिश्चिती करते. 

 

 

 

  

 

 

 

N.Meshram/S.Kakade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016466) Visitor Counter : 203