माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती प्रसारण मंत्रालयाने समाज माध्यमांवरील इन्फ्लुएन्सर्स अर्थात प्रभावशाली व्यक्तींना सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित परदेशी ऑनलाईन व्यासपीठांना समर्थन दर्शवण्यासंदर्भात दिला सावधगिरी बाळगण्याचा इशारा
ऑनलाईन जुगाराचे लक्षणीय वित्तीय आणि सामाजिक- आर्थिक दुष्परिणाम लक्षात घेऊन जुगार खेळणाऱ्यांमध्ये या दुष्परिणामांबाबत जागरुकता निर्माण करण्याची इन्फ्लुएन्सर्सना केली सूचना
मंत्रालयाच्या सूचनेचा भंग करणाऱ्यांचे समाज माध्यमावरील संदेश काढून टाकणार, खाती बंद करणार
Posted On:
21 MAR 2024 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 मार्च 2024
सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित परदेशी ऑनलाईन व्यासपीठांचा प्रचार किंवा जाहिराती करणे टाळावे असा सावधगिरीचा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज समाज माध्यमांवरील इन्फ्लुएन्सर्स आणि इतर प्रभावशाली व्यक्तींना दिला आहे. अशा प्रकारच्या जाहिराती, समर्थनाचे ग्राहकांवर विशेषतः युवावर्गावर होणारे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम लक्षणीय आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
ऑनलाईन जाहिरातदारांनीही जुगाराला प्रोत्साहन देणारा मजकूर, संदेशांचा प्रसार भारतीय प्रेक्षकांमध्ये करू नये, असे मंत्रालयाने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे. समाज माध्यमांच्या वापरकर्त्यांवर ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तींनी जुगार खेळणाऱ्या अथवा त्याच्या प्रसाराला बळी पडू शकणाऱ्यांमध्ये दुष्परिणामांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही सूचना मंत्रालयाने केली आहे.
मंत्रालयाच्या या सूचनांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींच्या आधारे कारवाई केली जाईल. या कारवाईचा भाग म्हणून समाज माध्यमांवरील संदेश अथवा खाती काढून टाकली जातील. तसेच, प्रकरणाच्या गांभीर्य लक्षात घेऊन दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 79 तिऱ्हाईताची माहिती, विदा किंवा संवादाची लिंक उपलब्ध करून देणाऱ्या मध्यस्थांना दायित्वातून सूट देत असले तरी याच कलमाचे उपकलम (3)(b) बेकायदा कृत्यासाठी मध्यस्थाच्या संगणकाचा वापर झाल्याचे दिसून आल्यास ही सूट देण्यास मनाई करते, ही कायदेशीर बाब मंत्रालयाने आपल्या सूचनापत्रात अधोरेखित केली आहे.
बेटिंग, जुगाराला प्रसिद्ध व्यक्ती, इन्फ्लुएन्सर्सकडून समर्थन दर्शवण्याच्या, जाहिरात करण्याच्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने त्याला आळा घालण्यासाठी 6 मार्च 2024 रोजी सूचना जाहीर केल्या होत्या. या सूचनांचे पालन माहिती प्रसारण मंत्रालयाने बंधनकारक केले आहे.
मंत्रालयाच्या सूचनापत्राची लिंक –
https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20dated%2021.03.2021%20%281%29.pdf
S.Kane/R.Jathar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015987)
Visitor Counter : 103