पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्लीत पीएम स्वनिधीच्या लाभार्थ्यांना केले संबोधित
या योजनेंतर्गत 1 लाख फेरीवाल्यांना केले कर्ज वितरित
दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या दोन अतिरिक्त मार्गिकांसाठी केली पायाभरणी
“पीएम स्वनिधी योजना फेरीवाल्यांसाठी जीवनरेखा असल्याचे सिद्ध झाले आहे"
“जरी फेरीवाल्यांच्या विक्रीच्या गाड्या आणि दुकाने लहान असली तरी त्यांची स्वप्ने खूप मोठी आहेत”
“पीएम स्वनिधी योजना रस्त्यांवरील लाखो फेरीवाल्यांच्या कुटुंबांसाठी आधार व्यवस्था बनली आहे”
“गरीब आणि मध्यमवर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदी अथक काम करत आहेत. जनतेच्या कल्याणाद्वारे देशाचे कल्याण हा मोदींचा विचार आहे”
“सामान्य नागरिकांच्या स्वप्नांची भागीदारी आणि मोदींचा संकल्प ही उज्ज्वल भविष्याची हमी आहे”
Posted On:
14 MAR 2024 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित केले आणि या योजनेचा भाग म्हणून दिल्लीतील 5000 फेरीवाल्यांसह 1 लाख फेरीवाल्यांना (SVs) कर्जाचे वितरण केले. त्यांनी पाच लाभार्थ्यांच्या हाती पीएम स्वनिधी कर्जाचे धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या दोन अतिरिक्त मार्गिकांची पायाभरणी देखील केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी शेकडो शहरांमधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या लाखो फेरीवाल्यांच्या उपस्थितीची दखल घेतली.
महामारीच्या काळात फेरीवाल्यांच्या क्षमतेची आठवण करून देत पंतप्रधानांनी दैनंदिन जीवनातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरातल्या एक लाख फेरीवाल्यांच्या खात्यात पैसे थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत आणि त्याबरोबरच दिल्ली मेट्रो, लाजपत नगर-साकेत-जी ब्लॉक आणि इंद्रलोक- इंद्रप्रस्थ या दोन अतिरिक्त मार्गिकांचा प्रारंभ करण्यात आला असे पंतप्रधानांनी सांगितले. आपले कठोर परिश्रम आणि स्वाभिमानाने आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या लाखो फेरीवाल्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जरी त्यांच्या मालविक्रीच्या गाड्या आणि दुकाने लहान असली तरी त्यांची स्वप्ने खूप मोठी आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. यापूर्वीच्या सरकारांनी फेरीवाल्यांच्या कल्याणाकडे फारसे लक्ष पुरवले नव्हते ज्यामुळे त्यांना अनादर आणि अडचणींचा सामना करावा लागला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांची पैशाची गरज उच्च व्याज दर असलेल्या कर्जाद्वारे भागवण्यात आली तर उशिरा होणाऱ्या कर्जफेडीमुळे त्यांनी सन्मान गमावला आणि अधिक जास्त व्याजदर लागू झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी हे देखील नमूद केले की त्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची हमी नसल्याने बँकांची सोय उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत बँक खाते नसल्यामुळे आणि व्यवसायाची नोंद नसल्याने बँकेतून कर्ज मिळवणे त्यांच्यासाठी अशक्य झाले होते. “पूर्वीच्या सरकारांनी फेरीवाल्यांच्या गरजांकडे लक्ष दिले नाही किंवा त्यांच्या समस्या हाताळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत”, पंतप्रधान मोदी म्हणाले.
“तुमचा हा सेवक गरिबीतून वर आलेला आहे. मी गरिबी पाहिलेली आहे. म्हणूनच ज्यांची कोणीच काळजी घेतली नाही त्यांची काळजी मोदींनी घेतली, इतकेच नव्हे तर मोदींनी त्यांची पूजा केली,” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की ज्यांच्याकडे हमी देण्यासाठी तारण म्हणून काहीच नव्हते त्यांना मोदींच्या गॅरंटीने आश्वस्त केले.रस्त्यावरील विक्रेत्यांच्या सचोटीचे देखील त्यांनी कौतुक केले.रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या नोंदी तसेच डिजिटल व्यवहारांचे प्रमाण यांच्या आधारावर 10, 20 आणि 50 हजारांची कर्जे दिली जात आहेत. आतापर्यंत, 62 लाख लाभार्थ्यांना 11,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापैकी निम्म्याहून अधिक लाभार्थी महिला आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात झाली, त्याचे स्मरण करून पंतप्रधानांनी नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाच्या निष्कर्षांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की रस्त्यावरील फिरत्या विक्रेत्यांच्या उत्पन्नात अनेक पटींनी वाढ झाली आहे आणि खरेदी व्यवहारांची झालेली डिजिटल नोंद या लोकांना बँकेकडून विविध लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरत आहे असे या अहवालात म्हटले आहे. या सर्वांना दर वर्षी डिजिटल आर्थिक व्यवहारांसोबत 1200 रुपयांचे कॅशबॅक वापरता येणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.
या फेरीवाल्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात ज्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते त्या ठळकपणे मांडत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्यापैकी अनेक जण रोजीरोटी कमावण्यासाठी शहराकडे धाव घेतात. “पंतप्रधान स्वनिधी ही योजना लाभार्थ्यांना बँक प्रणालीशी जोडते. इतकेच नव्हे तर या योजनेमुळे फेरीवाल्यांना इतर सरकारी लाभ घेण्याचा मार्ग देखील खुला होतो,” मोफत अन्नधान्य, मोफत वैद्यकीय उपचार तसेच मोफत गॅस जोडणी यांचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले. देशभरात कोणत्याही ठिकाणी मोफत अन्नधान्य मिळण्याची तरतूद करणाऱ्या ‘एक देश, एक शिधापत्रिका’ या योजनेच्या परिवर्तनशील दृष्टिकोनावर देखील त्यांनी अधिक भर दिला.
सरकारने बांधलेल्या 4 कोटी पक्क्या घरांपैकी 1 कोटी घरे शहरी भागातील गरिबांना देण्यात आली. झोपड्यांच्या ऐवजी लोकांना पक्की घरे बांधून देण्यासाठीच्या व्यापक अभियानाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणले की दिल्लीमध्ये 3000 घरे याआधीच बांधून पूर्ण झाली आहेत आणि 3500 घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. अनधिकृत वसाहतींचे लवकरात लवकर नियमितीकरण आणि 75,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह राबवण्यात येणारी पंतप्रधान सूर्यघर योजना यांचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.
“दिल्लीतील गरीब आणि मध्यमवर्ग यांचे जीवन अधिक सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकार अहोरात्र काम करत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मध्यमवर्ग तसेच शहरी भागातील गरिबांसाठी पक्की घरे बांधण्याच्या योजनेचे उदाहरण देत ते म्हणाले की या घरांच्या बांधकामासाठी 50,000 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी देशभरातील डझनभर शहरांमध्ये मेट्रो सेवांचे तसेच विजेवर चालणाऱ्या बसची सेवा सुरु करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे याचा उल्लेख त्यांनी केला. दिल्लीतील मेट्रो सेवेचे विस्तृत जाळे हे जगभरातील काही निवडक शहरांपैकी एक आहे यावर अधिक भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या 10 वर्षात, दिल्लीच्या मेट्रो सेवेचे जाळे दुपटीने विस्तारले आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिल्ली एनसीआर विभागासाठीच्या नमो भारत रॅपिड रेल्वे कनेक्टिव्हिटीचाही उल्लेख केला. "शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकार दिल्लीत 1000 हून अधिक इलेक्ट्रिक बस चालवत आहे", असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी असेही नमूद केले की, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिल्लीच्या आसपास अनेक द्रुतगती महामार्ग बांधले गेले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी या आठवड्याच्या सुरुवातीला द्वारका द्रुतगती महामार्गाच्या झालेल्या उद्घाटनाची आठवण करून दिली.
युवकांमध्ये खेळाला चालना देण्याच्या उपक्रमाविषयी बोलताना पंतप्रधानांनी खेलो इंडिया अभियानाने सामान्य कुटुंबातील तरुणांना अभूतपूर्व संधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करतानाच या क्षेत्रात सुविधा अधिक सुलभ होत आहेत आणि खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी मदत केली जात आहे असेही आवर्जून नमूद केले.
“मोदी गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. मोदींची विचारसरणी ‘जनतेच्या कल्याणातून राष्ट्राचे कल्याण’, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण मुळापासून नष्ट करणे आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे ही आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
"सामान्य नागरिकांची स्वप्ने आणि मोदींचा संकल्प ही भागीदारीच उज्ज्वल भविष्याची हमी आहे" असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत किशनराव कराड उपस्थित होते.
पार्श्वभूमी
उपेक्षित घटकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम स्वनिधी योजना 1 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. फेरीवाले या उपेक्षित समुदायांसाठी ही योजना परिवर्तनकारी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. आतापर्यंत, देशभरातील 62 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना 10,978 कोटी रुपयांची 82 लाखांहून अधिक कर्जे वितरित करण्यात आली आहेत. एकट्या दिल्लीत सुमारे 2 लाख कर्जांचे वितरण झाले आहे, ज्याची रक्कम 232 कोटी रुपये एवढी आहे. ही योजना आर्थिक समावेशकता आणि ऐतिहासिकदृष्ट्या अगदी कमी उत्पन्न असलेल्या दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रेरणादायी ठरली आहे .
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोच्या लजपत नगर – साकेत-जी ब्लॉक आणि इंद्रलोक – इंद्रप्रस्थ या दोन अतिरिक्त मार्गिकांची पायाभरणी केली. या दोन मार्गिकांची एकत्रित लांबी 20 किमी पेक्षा जास्त असेल आणि यामुळे संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मदत मिळेल.
लजपत नगर ते साकेत जी-ब्लॉक कॉरिडॉरवरील स्थानकांमध्ये लजपत नगर, अँड्र्यूज गंज, ग्रेटर कैलाश – 1, चिराग दिल्ली, पुष्पा भवन, साकेत जिल्हा केंद्र, पुष्प विहार, साकेत जी – ब्लॉक यांचा समावेश असेल. इंद्रलोक – इंद्रप्रस्थ कॉरिडॉरवरील स्थानकांमध्ये इंद्रलोक, दया बस्ती, सराय रोहिल्ला, अजमल खान पार्क, नबी करीम, नवी दिल्ली, एलएनजेपी हॉस्पिटल, दिल्ली गेट, दिल्ली सचिवालय, इंद्रप्रस्थ यांचा समावेश असेल.
* * *
S.Kane/ShaileshP/Sanjana/Vikas/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2014726)
Visitor Counter : 144
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam