ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी समूहाने वर्ष 2023-24 मध्ये 400 अब्ज युनिट्स वीज निर्मितीचा टप्पा ओलांडला, मागील वर्षातील वीज निर्मिती टाकले मागे

Posted On: 14 MAR 2024 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मार्च 2024

 

एनटीपीसी समूहाने चालू आर्थिक वर्षात 13 मार्च 2024 रोजी आपल्या एकूण वीज निर्मितीचा 400 अब्ज युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 399.3 अब्ज युनिट्स एवढी वीज निर्मिती केली होती.

चालू आर्थिक वर्षात 13 मार्च 2024 पर्यंत, एनटीपीसीच्या कोळसा केंद्रात वीज निर्मितीसाठी होणारा सरासरी कोळशाचा वापर (प्लांट लोडिंग फॅक्टर ) 77.06% वर आणून एनटीपीसी समूहाने हा टप्पा गाठला.

चालू वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने 1 सप्टेंबर 2023 रोजी 1,428 दशलक्ष युनिट्स एवढी एका दिवसातली वीज निर्मिती करून आतापर्यंतची सर्वाधिक एक दिवसीय वीज निर्मितीची नोंद केली आहे. एनटीपीसी युनिटची ही उत्कृष्ट कामगिरी एनटीपीसीच्या अभियंत्यांच्या कौशल्याची आणि त्यांच्या देखभाल दुरुस्ती पद्धती आणि कार्यप्रणालीचा दाखला आहे.

त्याचबरोबर, कंपनीच्या या कामगिरीमुळे राष्ट्राला विश्वासार्ह आणि परवडणारी वीज देण्याच्या एनटीपीसीच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते.

एनटीपीसी कंपनीची सध्याची स्थापित उर्जा क्षमता ही 75.4  गिगावॅट (जीडब्ल्यू ) आहे, तर 18 गिगावॅट क्षमता असलेला, ज्यामध्ये 5 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचा समावेश असलेल्या प्रकल्पाचे  बांधकाम प्रगतीपथावर आहे. कंपनी वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.

वीजनिर्मितीसोबतच, एनटीपीसी समूहाने ई-मोबिलिटी, वेस्ट-टू-एनर्जी (टाकाऊ वस्तु पासून ऊर्जा निर्मिती), हरित हायड्रोजन पर्यायांसह विविध नवीन व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वीज वितरणासाठी झालेल्या बोली प्रक्रियेतही आपला सहभाग नोंदवला आहे.

एनटीपीसी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज निर्मिती करणारी कंपनी आहे, जी देशाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी 1/4 भाग वीज पुरवते. औष्णिक, जलविद्युत, सौर आणि पवन ऊर्जा अशा विविध ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून एनटीपीसी कंपनी देशाला विश्वासार्ह, परवडणारी आणि शाश्वत वीज पुरवण्यासाठी समर्पित आहे. कंपनी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी आणि हरित भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी वचनबद्ध आहे.

एनटीपीसी समूहाने आतापर्यंतची सर्वात जलद 300 अब्ज युनिट वीज निर्मिती साध्य केली आहे. 

 

* * *

S.Kane/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014555) Visitor Counter : 81


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil