वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत आणि डॉमिनिकन प्रजासत्ताक यांच्यात व्यापार आणि वाणिज्य विषयक पहिली द्वैपक्षीय संस्थात्मक यंत्रणा स्थापन करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 13 MAR 2024 11:58AM by PIB Mumbai

भारत आणि डॉमिनिकन प्रजासत्ताक यांच्यात संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती (जेटको) स्थापन करण्याच्या करारावर 12 मार्च 2024 रोजी सांतो डोमिंगो येथे डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात (एमआयआरईएक्स) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. डॉमिनिकन रिपब्लिकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रॉबर्टो अल्वारेझ आणि डॉमिनिकन रिपब्लिकमधील भारताचे राजदूत रामू अब्बागानी यांनी वाणिज्य विभागाच्या वतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 जानेवारी 2024 रोजी जेटकोच्या स्थापनेसाठी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 25 वर्षांच्या काळात झालेला हा करार, सध्याच्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांना आणखी उंचावण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण कार्यक्रम आणि क्षमता बांधणीद्वारे व्यापार, सेवा, औद्योगिक तंत्रज्ञान आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट आणि विकसित करण्याची तरतूद या करारात आहे. व्यापार आणि उद्योगांना भेडसावणारी आव्हाने कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल आणि दोन्ही देशांदरम्यान ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. भारत प्रामुख्याने डॉमिनिकन प्रजासत्ताक मधून सोने आयात करतो आणि त्यांना औषधे, सागरी उत्पादने, मोटार वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहने इत्यादींची निर्यात करतो.

भारत-डोमिनिकन प्रजासत्ताक जेटकोची पहिली बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

***

NM/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014089) Visitor Counter : 106