राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींचा मॉरिशस दौरा; मॉरिशसचे राष्ट्रपती रूपून आणि पंतप्रधान जगन्नाथ यांची घेतली भेट

Posted On: 12 MAR 2024 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2024 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल (11 मार्च 2024) त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर मॉरिशस येथे पोहोचल्या. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य आणि मॉरीशसमधील ज्येष्ठ मान्यवरांसह सर सीवूसागर रामगोलम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित राहून संपूर्ण सरकारी इतमामासह त्यांचे स्वागत केले.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ला रेडूइट येथील सरकारी सदनात मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रुपून यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस या देशांदरम्यान असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुआयामी संबंधांना आणखी बळकट करण्यासाठीच्या मार्गांबाबत चर्चा केली. मॉरिशसच्या सरकारी सदन परिसरात उभारलेल्या आयुर्वेदिक बगीचाला देखील राष्ट्रपती मुर्मू यांनी भेट दिली.

नंतर, राष्ट्रपती मुर्मू यांनी पॅम्पलमुसेस येथील सर सीवूसागर रामगोलम वनस्पती उद्यानाला भेट दिली आणि सर सीवूसागर रामगोलम तसेच सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केले.

संध्याकाळी, पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले.

मेजवानीच्या प्रसंगी उपस्थितांना संबोधून केलेल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की स्वतंत्र देश म्हणून केवळ 56 वर्षांच्या कमी कालावधीमध्ये  मॉरिशस देश एक आघाडीची लोकशाही, अनेकतत्ववादाचे प्रतीक, समृद्ध राष्ट्र, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र, भरभराटीला आलेले पर्यटनस्थळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित आणि शांतताप्रिय देश म्हणून उदयाला आला आहे.केवळ आफ्रीकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणाऱ्या “मॉरिशियन मिरॅकल”पद्धतीची अर्थव्यवस्था उभारणाऱ्या मॉरिशसमधील द्रष्ट्या राष्ट्र-निर्मात्यांची त्यांनी प्रशंसा केली.

राष्ट्रपती म्हणाल्या की भारतीयांना मॉरिशसमधील त्यांच्या बंधू-भगिनींचे यश पाहून अत्यंत अभिमान वाटतो. भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांची सरकारे एकमेकांना प्राधान्य देत असून या संबंधांमध्ये गुंतवणूक करत राहिल्यामुळे गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये वेगवान प्रगती शक्य झाली असे मत त्यांनी नोंदवले.

मॉरिशसमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सातव्या पिढीतील सदस्य भारताचे परदेशी नागरिकत्व मिळण्यास पात्र ठरण्यासाठीच्या विशेष नव्या तरतुदीची त्यांनी घोषणा केली- सदर तरतुदीमुळे अनेक तरुण मॉरिशसवासियांना त्यांच्या पूर्वजांच्या भूमीशी पुन्हा जोडले जाने शक्य होईल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की विकसित देश होण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना आम्ही मॉरिशससारखे आमचे जवळचे सहकारी सोबत घेत वाटचाल करू.”वसुधैव कुटुंबकम” आणि “सर्वजना सुखिन भवन्तु” या मध्यवर्ती तत्वांचे आचरण करत जागतिक शांतता आणि समृद्धीसाठीचा स्त्रोत म्हणून कार्यरत राहील.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013887) Visitor Counter : 39