युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव, 2024 च्या समारोपाच्या दिवशी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले मार्गदर्शन
2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनवण्यात युवकांची विचारक्षमता, नवनवीन शोध घेण्याची क्षमता आणि काम करण्याचा झपाटा मोलाचा ठरेल: ओम बिर्ला
दृढनिश्चयी युवकांचा आवाजच नवीन भारत निर्माणाचा निर्धार दर्शवतो: अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
06 MAR 2024 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2024
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसद महोत्सव, 2024 च्या समारोप समारंभाला संबोधित केले.
हरयाणातील यतीन भास्कर दुग्गल (प्रथम पारितोषिक विजेता)
तमिळनाडू येथील वैष्णा पिचाई (द्वितीय पारितोषिक विजेती)
राजस्थानची कनिष्का शर्मा (तृतीय पारितोषिक विजेती)
याप्रसंगी ओम बिर्ला यांनी सर्व सहभागी आणि विजेत्यांचे अभिनंदन केले. मध्यवर्ती सभागृहाला इतिहास असून स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मिती करताना हे सभागृह केंद्रस्थानी होते, असे बिर्ला म्हणाले. युवकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी तरुणांची विचार क्षमता, नवनवीन शोध घेण्याची क्षमता आणि काम करण्याची जिद्द मोलाची ठरेल, असेही ते म्हणाले. भारत हा केवळ विकसित भारत बनणार नाही तर संपूर्ण जगाला मार्ग दाखवेल. असे त्यांनी पुढे सांगितले. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करतानाच भारताने आपला वारसा जपला आहे, असेही बिर्ला म्हणाले.
दृढनिश्चयी युवकांचा आवाजच नवीन भारत निर्माणाचा निर्धार दर्शवतो, असे मंत्री ठाकूर यावेळी म्हणाले. भारताने तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला असून पाच विकसनील, संवेदनशील अर्थव्यवस्थांमध्ये गणल्या गेलेल्या भारताची वाटचाल आता जगातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये झाली आहे, असे ठाकूर यांनी नमूद केले.
'यंग व्हॉइसेस: एनगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन' या संकल्पनेवर या वर्षी राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते.
9 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत देशभरात हा महोत्सव झाला. या युवा संसदेचे आयोजन देशातील 785 जिल्ह्यांमध्ये तीन स्तरांवर करण्यात आले.
9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्हा युवा संसद आयोजित करण्यात आली. त्यातील विजेते 19 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्य युवा संसदेत सहभागी झाले.
5 आणि 6 मार्च 2024 रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसदेची अंतिम फेरी झाली. त्यात 87 राज्यस्तरीय विजेत्यांपैकी 29 (प्रत्येक राज्य युवा संसदेतील प्रथम स्थानधारक) जण त्यांना दिलेल्या विषयांवर बोलले. त्यातून पहिले तीन विजेते जाहीर करण्यात आले. उर्वरित 58 प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले.
पार्श्वभूमी:
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या माध्यमातून जिल्हा युवा संसद, राज्य युवा संसद आणि राष्ट्रीय युवा संसद आयोजित केली होती. लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करणे हा या युवा संसदेचा उद्देश होता. शिस्त लावणे, इतरांच्या दृष्टिकोनाबाबत सहिष्णुता निर्माण करणे तसेच युवकांना तरुणांना संसदेच्या पद्धती आणि कार्यपद्धती समजावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांच्या सक्रियतेबद्दल युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा हेतू होता. अशा प्रकारच्या युवा संसदेमुळे युवकांच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन मिळते, त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होते आणि त्यांना या प्रक्रियेत राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी ते सक्षम होतात.
तिसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 14 ते 27 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जिल्हा आणि राज्य स्तरावर तर राष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्ष उपस्थितीने 10 आणि 1 मार्च 2022 रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झाला. चौथा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 25 ते 29 जानेवारी 2023 आणि 3 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा आणि राज्य स्तरावर झाला. प्रत्यक्ष सहभागाद्वारे राष्ट्रीय स्तरावर 1-2 मार्च 2023 रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झाला.
* * *
S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012071)
Visitor Counter : 179