गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्रातील मुंबई येथे आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद - एनएक्सटी 10 ला केले संबोधित


भारताचा विकास केवळ सरकारच्या महत्त्वाकांक्षेने नव्हे तर नागरिकांच्या आत्मविश्वासाने होऊ शकतो

मोदीजींच्या नेतृत्वाखाली वैश्विक पटलावर भारताचा अंधूक ठिपका ते झळाळता तारा म्हणून उदय

नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर 3 वर्षांत देशात कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळेलच, ही मोदींची हमी आहे.

Posted On: 06 MAR 2024 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मार्च 2024 

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज  मुंबईत आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद - एनएक्सटी 10 ला संबोधित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

येत्या काही महिन्यांत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणुका होणार आहेत असे अमित शहा यावेळी म्हणाले. भारतातील येत्या निवडणुका आगामी 25 वर्षांचे भविष्य ठरवतील. गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत आणि त्या पायावर, 2047 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत कुठे असेल, हे पुढील 5 वर्षांत निश्चित केले जाईल असे ते म्हणाले. ही निवडणूक लोकशाहीचा तसेच गरीब कल्याण, लोक कल्याण, परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्यात समन्वय स्थापित करणे तसेच लोकशाही आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्याचा उत्सव आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकारने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात  50 हून अधिक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे भारताची दिशा आणि स्थिती बदलल्याचे साऱ्या जगाने मान्य केले आहे, असे अमित शहा म्हणाले. 2016 मध्ये नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला, बनावट चलनही थांबले.  2017 मध्ये सरकारने जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आणला, एनपीए अर्थात नॉन पफॉर्मिंग असेटसची समस्या सोडवण्यासाठी मोठे निर्णय घेतले, जन-धन-आधार-मोबाईलच्या रूपात डिजिटल व्यवहारांची व्याप्ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाढवली, असे त्यांनी सांगितले.

भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या सुरक्षेला कोणीही बाधा पोहोचवू शकत नाही, असा संदेश भारताने संपूर्ण जगाला सर्जिकल आणि हवाई हल्ले करून दिल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

मोदींनी तिहेरी तलाक संपवून कोट्यवधी मुस्लिम माता-भगिनींना हक्क मिळवून दिला, सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा मंजूर करून निर्वासितांना नागरिकत्वाचे अधिकार दिले, राज्यघटनेतील 370 आणि 35 अ  ही कलमे रद्द केली आणि काश्मीरला कायमचे भारताशी जोडले, असेही शहा म्हणाले.

भविष्यातील भारत आणि आपली मूल्ये या दोन्हीचा समावेश असलेले नवीन शैक्षणिक धोरण मोदी सरकारने आणले असे मतही त्यांनी व्यक्त केले.  देशातील महिलांना धोरणनिर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मोदी सरकारने नारी शक्ती वंदन कायदा आणला असून विधानसभा आणि संसदेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे, अशी माहिती शहा यांनी दिली.

इंग्रजांनी बनवलेल्या फौजदारी न्याय व्यवस्थेतील तीन कायद्यांच्या जागी आम्ही तीन नवे कायदे आणले आणि हे कायदे लागू झाल्यानंतर देशातील कोणत्याही खटल्यात तीन वर्षांच्या आत न्याय मिळेल आणि पुढची तारीख मिळणे ही गोष्ट भूतकाळात जमा होईल, ही मोदींची हमी असल्याचे शहा म्हणाले.

राजपथाचे कर्तव्यपथात रूपांतर करण्याचे काम मोदी यांनी केले, असे अमित शहा म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी, डावे नक्षलवादी आणि सशस्त्र बंडखोर गटांवर कारवाई करून देशात शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले, असेही त्यांनी सांगितले. देशात पूर्वी तीन संवेदनशील क्षेत्रे होती, हॉटस्पॉट होते – ईशान्य, डाव्या कट्टरवादाने प्रभावित क्षेत्रे आणि काश्मीर – आणि आज या तीनही ठिकाणच्या दहशतवादी कारवाया 72 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या आहेत आणि 10 हजारांहून अधिक दहशतवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत आणि ते शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात आले आहेत आणि त्यामुळे खूप मोठे परिवर्चन झाले आहे, असे शहा म्हणाले.

देशातील कोट्यवधी लोकांना मूलभूत सुविधा देऊन देशाच्या विकासाशी जोडण्याचे सर्वात मोठे काम मोदी यांनी केले आहे, असे शहा यांनी पुढे सांगितले.

मोदी यांनी 10 कोटी लोकांना गॅस सिलिंडर, 12 कोटी लोकांना शौचालये, 14 कोटी लोकांना नळाचे पाणी, 11 कोटी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये, 4 कोटी लोकांना घरे आणि 60 कोटी लोकांना आरोग्याचा खर्च भागवण्यासाठी 5 लाख रुपये दिले आहेत. 60 कोटी लोकांना बाजूला ठेवून कोणताही देश विकासाच्या मार्गावर चालू शकत नाही आणि आज आपली बाजारपेठ 130 कोटी लोकांची आहे, असे शहा म्हणाले.

मुंबई शेअर बाजाराचा 22 हजारांवरून वाढत 73 हजारांवर पोहोचलेला निर्देशांक हा आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचे मोठे द्योतक आहे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, मागील सरकारच्या काळात प्रत्यक्ष करदात्यांची संख्या 4.7 कोटी होती, जी आज 8.18 कोटी झाली असून अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या 60 लाखांवरून वाढून 1 कोटी 40 लाख झाली आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात, भारत 81 व्या क्रमांकावरून चांगली कामगिरी करत 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात 2013-14 मध्ये ब्रॉडबँड वापरणारे लोक 6 कोटी होते जे आज 90 कोटी आहेत. 10 वर्षांपूर्वी आपण जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या क्रमांकावर होतो, आज आपण 5 व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत असे शाह यांनी सांगितले.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक पटलावर अविकसिततेतून विकसित अवस्थेत उदयास आला आहे आणि मोदीजींनी मूक पंतप्रधान ते उत्साही पंतप्रधान असा प्रवास घडवला असल्याचे शाह यांनी उद्धृत केले. नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आपल्याला एक दूरदर्शी पंतप्रधान लाभले आहेत, ज्यांच्याकडे दूरदृष्टी असण्यासोबतच युग परिवर्तनाची क्षमता आहे. मोदी सरकारने गुंतवणूक, नवोन्मेष आणि संकल्पनांसाठी मंच देऊन तरुणांना त्याच्याशी जोडले आहे, ज्यामुळे एक नवीन नांदी झाली आहे असा उल्लेख शाह यांनी केला. 

केंद्रीय गृहमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला की, गेल्या 10 वर्षात इतकं काम झालं आहे की, दर आठवड्याला एक विद्यापीठ, दररोज 2 नवीन महाविद्यालये उघडली गेली आहेत, दररोज 55 पेटंट आणि 600 ट्रेडमार्क नोंदणीकृत झाले आहेत, दररोज 1.5 लाख गरिबांना मुद्रा कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे, दररोज 37 नवीन स्टार्टअप तयार केले आहेत, दररोज 16,000 कोटी रुपयांचे युपीआय व्यवहार झाले आहेत, दररोज 3 नवीन जनऔषधी केंद्रे उघडली आहेत, 14 किमी रेल्वे मार्गांची निर्मिती, 50,000 हून अधिक गॅस सिलेंडर कनेक्शन आणि दररोज 75,000 लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले आहे. शाह म्हणाले की आज मोदी सरकारच्या काळात 25 कोटी जनता दारिद्र्यमुक्त झाली आहे.

जी 20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखरपरिषदेत  दिल्ली घोषणापत्र एकमताने मंजूर करण्यात आले आणि  जी 20 गटात आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आल्याचे अमित शाह यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे काय मत आहे हे जाणून घेतात. मोदीजींनी अनेक नवीन क्षेत्रात भारताला अग्रेसर बनवण्याचे काम केले आहे आणि येत्या 5 वर्षांत आम्ही संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. वर्ष 2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणे, 2030 पर्यंत 2 ट्रिलियन डॉलर्सची निर्यात, 2025 पर्यंत अंतराळ स्थानक उभारणे, 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे, 2040 मध्ये चंद्रावर मानव पाठवणे आणि 2047 पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून विश्वगुरू बनण्याचे लक्ष्य मोदीजींनी आपल्यासमोर ठेवले आहे. भारताचा विकास केवळ सरकारच्या महत्त्वाकांक्षेने नाही तर नागरिकांच्या आत्मविश्वासाने होऊ शकतो, असे ते म्हणाले.

 

* * *

JPS/NM/Vinayak/Prajna/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012032) Visitor Counter : 85


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi