निती आयोग
भविष्यातील तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकरण करताना नवोन्मेषी संकल्पना प्रत्यक्षात आणून युवकांच्या सक्षमीकरणासाठी फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब स्थापणार - अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि मेटा यांचा संयुक्त कार्यक्रम
कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, 3डी प्रिंटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या सारख्या तंत्रज्ञानावर प्रयोगशाळांमध्ये देणार भर
Posted On:
06 MAR 2024 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2024
भविष्यातील तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकरण आणि नवनिर्मिती यासाठी तरुणांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अटल इनोव्हेशन मिशन (एम), निती आयोग आणि मेटा यांनी फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब (एफटीएलएस) सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रमुख शाळांमध्ये या प्रयोगशाळा उभारण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन आणि मेटा सहकार्य करतील. संपूर्ण भारतातील विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना आघाडीचे तंत्रज्ञान शिकण्याच्या आणि त्यात सहभागी होण्याच्या समान संधी मिळाव्यात यावर या प्रयोगशाळा भर देतील. ‘एम’ ने भारतातील 722 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये 10,000 अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) स्थापन केल्या आहेत. तरुणांच्या मनात कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवणे तसेच त्यांची मानसिकता तयार करणे, संगणकीय विचार, भौतिक संगणन अशी कौशल्ये विकसित करणे हे एटीएल चे उद्दिष्ट आहे.
एफटीएल ही अटल टिंकरिंग लॅबची प्रगत आवृत्ती आहे. प्रगत आवृत्ती अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. तिच्यात टिंकरिंग लॅबच्या सर्व घटकांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, 3डी प्रिंटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून ते नवनवीन संशोधनासाठी सक्षम बनू शकतील. तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने होत असल्यामुळे विकासाच्या पार्श्वभूमीवर सतत बदलत असलेल्या परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी युवकांना डिजिटल कौशल्यांसह सुसज्ज करण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठीच या प्रयोगशाळा तयार केलेल्या आहेत. एफटीएलसाठी मेटा निधी देणार आहे तर अटल इनोव्हेशन मिशन हे ज्ञान भागीदार असेल.
आकर्षक कार्यशाळा, परस्परसंवादी सत्रे आणि प्रकल्प-आधारित शिक्षणाद्वारे, विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा प्रभावीपणे वापर करणे, उत्पादक कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह एआय) आणि सत्वर (प्रॉम्प्ट) अभियांत्रिकी समजून घेणे, प्रत्यक्ष वास्तव (एआर) आणि आभासी वास्तव (व्हीआर) वापरून वैज्ञानिक संकल्पनांचा अन्योन्य संबंध शोधणे, नवीन काळातील सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाणे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना अभिनव उपाय तयार करण्यासाठी लामा आणि इतर एआय साधनासारख्या मेटा कडून साधने आणि संसाधने उपलब्ध करून दिली जातील.
“नीती आयोगाचे अटल नवोन्मेष अभियान आणि मेटा यांच्यातील सहकार्य हे भारतातील आमच्या तरुणांच्या क्षमतांचा उपयोग करून भविष्यातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सक्षम प्रतिभावान समूह तयार करण्याचा पुरावा आहे. या प्रयोगशाळा भविष्याला आकार देणाऱ्या अत्याधुनिक क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी आणि त्यात योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साधने प्रदान करून नवोन्मेष केंद्र म्हणून काम करतील” असे नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांनी नमूद केले.
“तरुणांना भारतातील सघन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून अग्रमानांकित तंत्रज्ञान प्रयोगशाळांची स्थापना करण्यासाठी नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानासोबत भागीदारी करताना आम्ही उल्हसित आहोत. जनरेटिव्ह एआय, एआर, व्हीआर आणि आपल्या जगाला आकार देणाऱ्या इतर तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय शोधण्यास विद्यार्थ्यांना सक्षम करून, आम्ही नवोन्मेष, सर्जनशीलता आणि समस्या निराकारणाच्या परिसंस्थेला चालना देत आहोत,” असे मेटाच्या भारतीय सार्वजनिक धोरण विभागाचे संचालक आणि प्रमुख शिवनाथ ठुकराल यांनी उद्धृत केले.
या प्रयोगशाळांची स्थापना म्हणजे अटल नवोन्मेष अभियानाच्या दृष्टीकोनातून संपूर्ण भारतातील शाळांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेची संस्कृती निर्माण करण्यासाठी, भविष्यातील आव्हाने आणि संधींचा सामना करण्यासाठी एक कुशल कर्मचारी वर्ग तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दरम्यान, या प्रयोगशाळांचे व्यवस्थापन मेटाच्या भागीदार 1एम1बी (वन मिलियन फॉर वन बिलियन) द्वारे केले जाईल.
* * *
S.Bedekar/Prajna/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011979)
Visitor Counter : 120