पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रात यवतमाळ येथे विविध प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
28 FEB 2024 10:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 28 फेब्रुवारी 2024
जय भवानी, जय भवानी, जय सेवालाल! जय बिरसा!
तुम्हां सर्वांना माझा नमस्कार!
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैसजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर ज्येष्ठ मान्यवर, देशाच्या इतर भागांतून देखील मोठ्या संख्येने आपले शेतकरी बंधू-भगिनी आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत, त्यांचे देखील मी येथून स्वागत करतो.
बंधुंनो आणि भगिनींनो,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पावन भूमीला मी अत्यंत श्रद्धेने वंदन करतो. महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचा अभिमान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करतो. यवतमाळ-वाशिम तांडेर मार गोर बंजारा बंधू, भिया, नायक, डाव, कारभारी तुम्हां सर्वांना माझा हात जोडून नमस्कार!
मित्रांनो,
दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी यवतमाळला आलो होतो तेव्हा तुम्ही मला खूप आशीर्वाद दिले होते. आणि देशातील जनतेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300 हून अधिक जागा जिंकून दिल्या. त्यानंतर, 2019 च्या फेब्रुवारी महिन्यातच मी पुन्हा यवतमाळला आलो होतो. त्यावेळी देखील तुम्हा सर्वांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. देशाने तेव्हा देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 350 हून अधिक जागांवर विजय मिळवून दिला. आणि आज मी 2024 च्या निवडणुकीच्या आधी विकासाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलो आहे, तेव्हा संपूर्ण देशात एकच आवाज दुमदुमतो आहे.
अबकी बार...400 पार, अबकी बार...400 पार म्हणजेच यावेळी 400 पेक्षा अधिक जागांवर विजय! मला आत्ता माझ्यासमोर दिसत आहे, किती मोठ्या प्रमाणात माता-भगिनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत, जीवनात याहून अधिक भाग्य काय असू शकेल? गावागावांतून आमच्याशी जोडलेल्या या माता-भगिनींना मी विशेष नमस्कार करतो. ज्या प्रकारे यवतमाळ, वाशिम, चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचे भरभरुन आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत, ते पाहता असे वाटते आहे की, सगळ्यांनी ठरवून टाकलं आहे...एनडीए सरकार....400 च्या पार! एनडीए सरकार....400 च्या पार!
मित्रांनो,
आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे लोक आहोत. त्यांच्या राज्यकारभाराला साडेतीनशे वर्षे होऊन गेली आहेत. त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, सगळी सुखे मिळाली तेव्हा ते देखील आरामात सत्ता भोगू शकले असते. मात्र त्यांनी सत्तेला नव्हे तर राष्ट्रीय प्रेरणेला, राष्ट्रशक्तीला सर्वोच्च स्थान दिले. आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यासाठीच कार्य केले. आम्ही देखील राष्ट्र उभारणीची, देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची मोहीम हाती घेऊन वाटचाल करणारे लोक आहोत.
म्हणूनच गेल्या 10 वर्षात आम्ही जे कार्य केले तो येणाऱ्या 25 वर्षांसाठीचा पाया आहे. मी भारताच्या कानाकोपऱ्याला विकसित करण्याचा निर्धार केला आहे. या निश्चयाच्या पूर्ततेसाठी शरीराचा कणनकण, जीवनाचा क्षण अन क्षण तुमच्या सेवेप्रती समर्पित केलेला आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी चार सर्वात मोठे प्राधान्यक्रमांचे घटक आहेत ते म्हणजे – देशातील गरीब, शेतकरी, युवावर्ग आणि नारीशक्ती. हे चार घटक सक्षम झाले की प्रत्येक समाज, प्रत्येक घटक, देशातील प्रत्येक कुटुंब सक्षम होईल.
मित्रांनो,
आज येथे यवतमाळमध्ये याच गरीब, शेतकरी, युवावर्ग आणि नारीशक्ती या चार घटकांना सशक्त करणारे कार्य झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण झाले आहे. आज राज्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, गरिबांना पक्की घरे मिळत आहेत, गावातील माझ्या भगिनींना आर्थिक मदत मिळत आहे आणि युवा वर्गाचे भविष्य घडवणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या दरम्यानच्या रेल्वे संपर्क सुविधेत सुधारणा करणारे नवे रेल्वे प्रकल्प आणि नव्या गाड्या आज सुरु झाल्या आहेत. या सगळ्यासाठी मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
जरा आठवून पहा, ही जी इंडी आघाडी आहे, यांचे सरकार जेव्हा केंद्रात सत्तेवर होते तेव्हा काय स्थिती होती? त्यावेळी तर, कृषीमंत्री देखील इथलेच, महाराष्ट्रातलेच होते. त्यावेळी दिल्लीहून विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा होत असे आणि ही मदत मधल्यामध्ये दुसऱ्याच कोणाच्या घशात जात असे. गाव, गरीब, शेतकरी, आदिवासी यांना काहीच मिळत नसे. आज पहा, मी एक बटण दाबले आणि बघता बघता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे 21 हजार कोटी रुपये, लहानमोठी रक्कम नाहीये ही, तर हे 21 हजार कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे.
जेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेत होते तेव्हा दिल्लीहून 1 रुपया पाठवला तर लाभार्थ्याला केवळ 15 पैसे मिळत असत. आत्ता केंद्रात जर काँग्रेस सरकार असते तर आज तुम्हाला जे 21 हजार कोटी मिळाले आहेत त्यातले 18 हजार कोटी रुपये मध्येच कुठेतरी कोणीतरी लुबाडले असते. मात्र आता भाजपा सरकारच्या काळात, गरीबांसाठी पाठवलेले सगळेच्या सगळे पैसे गरिबांनाच मिळत आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा संपूर्ण हक्क मिळवून देणे, त्याच्या हक्काची पैनपै बँक त्याच्या खात्यात पोहोचणे ही मोदींची गॅरंटी आहे.
मित्रांनो,
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे तर दुहेरी इंजिनाची दुप्पट गॅरंटी आहे. नुकतेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 3800 कोटी रुपये वेगळे हस्तांतरित करण्यात आले आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतून दर वर्षी 12 हजार रुपये मिळत आहेत.
मित्रांनो,
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतून आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 3 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यातील 30 हजार कोटी तर यवतमाळच्या शेतकऱ्यांना 900 कोटी रुपये मिळाले आहेत. हा पैसा लहान लहान शेतकऱ्यांना किती उपयोगी ठरत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. काही दिवसांपूर्वी आमच्या सरकारने उसाच्या किफायतशीर मूल्यात विक्रमी वाढ केली आहे. आता उसाचे किफायतशीर मूल्य 340 रुपये क्विंटल झाले आहे.
याचा लाभ महाराष्ट्रातील कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि शेत मजुरांना मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या गावागावांमध्ये धान्याची गोदामे उभारण्यासाठीची, जगातील सर्वात मोठी योजना सुरु करण्यात आली आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या सहकारी समित्या, सहकारी संस्था यांनाच ही गोदामे उभारण्याचे काम सोपवण्यात आले आहे, या व्यवस्थेचे नियंत्रण देखील तेच करतील. यातून लहान शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यांना नाईलाजाने कमी किंमतीत त्यांच्या धान्याची विक्री करण्याची वेळ येणार नाही.
मित्रांनो,
विकसित भारतासाठी गावागावांमधील अर्थव्यवस्था अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठीच मागील 10 वर्षांमध्ये आमचा सतत हाच प्रयत्न राहिला आहे की गावांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या समस्यां दूर झाल्या पाहिजेत, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. पाण्याचे महत्व काय असते हे विदर्भापेक्षा आणखी चांगले कोण ओळखू शकते.
पिण्याचे पाणी असेल अथवा सिंचननासाठी वापरात येणारे पाणी असेल, 2014 च्या पूर्वी देशातल्या गावांमध्ये आक्रोश होता.परंतु इंडी युतीच्या त्या वेळच्या सरकारला याची कुठलीच काळजी नव्हती. तुम्ही जरा विचार करा स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत देशातल्या गावांमध्ये 100 मधील केवळ 15 कुटुंब अशी होती ज्यांच्या घरामध्ये नळाच्याद्वारे पाणी पोहोचत होते.100 पैकी फक्त 15 घरे आणि यामध्ये जास्तीत जास्त गरीब, दलित, मागास आणि आदिवासी होते.
ज्यांना हा लाभ मिळत नव्हता.हा आमच्या माता-भगिनींसाठी खूप मोठे संकट होते.याच समस्येपासून माता-भगिनींना बाहेर काढण्यासाठी लाल किल्ल्यावरून मोदींनी हर घर जल ची हमी दिलेली आहे. चार-पाच वर्षांच्या कालावधी मध्येच आज प्रत्येक 100 पैकी 75 ग्रामीण कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे 50 लाखापेक्षा कमी कुटुंबाजवळ नळाद्वारे पाणी मिळत होते.आज जवळजवळ सव्वा कोटी नळाच्या जोडण्या दिल्या गेल्या आहेत. तेव्हा तर संपूर्ण देश म्हणतो आहे, मोदी यांची गॅरंटी म्हणजेच गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण हमी.
मित्रांनो,
मोदींनी एक आणखी हमी देशातल्या शेतकऱ्यांना दिली होती.काँग्रेसच्या सरकारांनी अनेक दशकांपासून देशातील जवळजवळ 100 मोठ्या सिंचन योजना रखडवत ठेवल्या होत्या.यामधील 60 पेक्षा जास्त योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि राहिलेल्या सुद्धा पूर्ण होणार आहेत.रखडवलेल्या या सिंचन योजनांपैकी सर्वात जास्त 26 योजना या महाराष्ट्रातल्या आहेत. महाराष्ट्रातील विदर्भातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला हा जाणून घेण्याचा अधिकार आहे की, कोणाच्या पापाची शिक्षा आपल्या पिढ्यांना भोगावी लागत आहे. या 26 रखडवलेल्या योजनांपैकी बारा योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि बाकीच्या योजनांवर सुद्धा वेगाने काम सुरू आहे.
हे भाजपचे सरकार आहे, ज्या सरकारने निळवंडे कालवा योजनेला पन्नास वर्षानंतर पूर्ण करून दाखवले आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुद्धा दशकानंतर पूर्ण झालेल्या आहेत. गोसीखुर्द योजनेचे सुद्धा जास्तीत जास्त काम आमच्या सरकारने पूर्ण केलेले आहे. आज पण येथे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन आणि बळीराजा संजीवनी योजनेच्या अंतर्गत 51 प्रकल्पांचे लोकार्पण झालेले आहे. या प्रकल्पांमुळे 80 हजार हेक्टर पेक्षा अधिकची जमीन सिंचनाखाली येणार आहे.
मित्रांनो,
मोदींनी गावांमधल्या भगिनींना लखपती दीदी बनवण्याची हमी सुद्धा दिलेली आहे. आतापर्यंत देशात एक कोटी भगिनी लखपती दीदी बनलेल्या आहेत. या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही घोषणा केलेली आहे की, तीन कोटी भगिनींना लखपती दीदी बनवायचे आहे. आता या संकल्पाच्या सिद्धीसाठी मी झटत आहे. आज स्वयंसहाय्यता बचत गटांमधील भगिनी आणि मुलींची संख्या दहा कोटी पेक्षा जास्त झालेली आहे.
या भगिनींना बँकांमधून आठ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. याकरता 40000 कोटी रुपयांचा एक विशेष निधी केंद्र सरकारने दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बचत गटांशी जोडल्या गेलेल्या भगिनींना याचा खूप फायदा झालेला आहे. आज या अशा गटांना आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील अनेक भगिनींना इ रिक्षा सुद्धा देण्यात आले आहेत. मी शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र सरकारचे या कामासाठी विशेष रूपाने अभिनंदन करतो आहे.
आणि मित्रांनो,
आता भगिनी ई रिक्षा तर चालवत आहेत. आता तर ड्रोन सुद्धा चालवणार आहेत. नमो ड्रोन दीदी योजनेच्या अंतर्गत भगिनींच्या गटांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण दिले जात आहे. नंतर सरकार या भगिनींना ड्रोन प्रदान करेल, जो शेतीच्या कामात उपयोगी ठरणार आहे.
मित्रांनो,
आज इथे पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांच्या पुतळ्याचे सुद्धा लोकार्पण झालेले आहेत. पंडितजी अंत्योदयाचे प्रेरणा पुरुष होते. त्यांचे संपूर्ण जीवन गरिबांसाठी समर्पित राहिले होते. आपण सर्वजण पंडितजी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत असतो. मागची दहा वर्षे गरिबांसाठी समर्पित राहिलेली आहेत. पहिल्या वेळेस मोफत रेशनची हमी मिळालेली आहे.
पहिल्या वेळेस मोफत औषधोपचाराची सुविधा मिळालेली आहे. आज सुद्धा इथे महाराष्ट्रातल्या एक कोटी कुटुंबांना आयुष्यमान कार्ड देण्याचे अभियान सुरू झालेले आहे. पहिल्या वेळेस कोट्यवधी गरिबांसाठी अप्रतिम अशी पक्की घरे बनलेले आहेत. आज ओबीसी कुटुंबांसाठी घरे निर्माण करण्यासाठी विशेष योजना सुरू झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत दहा लाख ओबीसी कुटुंबांना पक्की घरे मिळणार आहेत.
मित्रांनो,
ज्यांना कधीही कोणीही विचारले नाही, त्यांना मोदींनी विचारले आहे, त्यांचे पूजन केले आहे. विश्वकर्मा मित्रांसाठी, बलुतेदार समूहातील कारागिरांसाठी कधीही कुठलीच मोठी योजना बनली नव्हती, मोदींनी पहिल्या वेळेस 13000 कोटी रुपयांच्ची पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात आदिवासी समाजाला नेहमीच सर्वात पाठीमागे ठेवले जायचे. त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नव्हत्या. परंतु मोदींनी, आदिवासी समाजातील सर्वात मागास प्रवर्गापर्यंत ची काळजी घेतलेली आहे. पहिल्या वेळेस त्यांच्या विकासासाठी 23 हजार कोटी रुपयांची पंतप्रधान जनमन योजना सुरू झालेली आहे. ही योजना महाराष्ट्रातील कातकरी, कोलाम आणि माडिया सारख्या अनेक आदिवासी समुदायांना चांगले जीवनमान प्रदान करेल.
गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलाशक्तीला सक्षम करण्याचे हे अभियान आणखीन तीव्र होणार आहे. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या अभियानामुळे अधिक वेगाने विकास साध्य होईल. येणारी पाच वर्षे विदर्भातल्या प्रत्येक कुटुंबांचे जीवनमान आणखीन चांगले बनवणारे असणार आहेत. पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबांना, आपल्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. माझ्या बरोबरीने बोला-
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप खूप धन्यवाद!
H.Akude/S.Chitnis/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2010421)
Visitor Counter : 99
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam