निती आयोग
नीती आयोगाने 'भारतातील ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या देखभालीत सुधारणा: ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीच्या प्रतिमानाची नव्याने आखणी' याविषयावर स्थिति पत्र जारी केले आहे
Posted On:
19 FEB 2024 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2024
नीती आयोगाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी 'भारतातील ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या देखभालीत सुधारणा: ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीच्या प्रतिमानाची नव्याने आखणी' याविषयावर स्थिति पत्र जारी केले आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते, आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. विनोद के. पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे सचिव सौरभ गर्ग यांच्या उपस्थितीत हा अहवाल जारी करण्यात आला.
या अहवालाच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे AS&MD, एल.एस. चांगसन, नीती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार राजीव सेन, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनाली पी. धकाते, आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव कविता गर्ग, देखील उपस्थित होत्या.
विकसित भारत @2047 चे उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यावेळी म्हणाले. ज्येष्ठांच्या देखभालीमध्ये तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करायला सर्वोच्च प्राधान्य देणे महत्वाचे आहे, ज्येष्ठांच्या काळजीमध्ये आता वैद्यकीय आणि सामाजिक पैलूंव्यतिरिक्त काही विशेष आयामांबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. असे त्यांनी सांगितले.
वृद्धत्वाकडे वाटचाल करताना ते सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि उत्पादक कसे राहील यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला ज्येष्ठांच्या सामाजिक सुरक्षेबद्दल अधिक सजग राहण्याबरोबरच त्यांना निरामय आरोग्य कसे लाभेल आणि त्यांची काळजी कशी घेतली जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी सांगितले.
“निरामय वृद्धत्वासाठी एक परिसंस्था विकसित करण्यासाठी कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. भारतातील निरोगी वृद्धत्वाबद्दल या अहवालाने धोरणकेंद्रित निर्देश आणले आहेत,” असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी संदर्भात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी नेमके काय करायला हवे याविषयी या अहवालात सांगितल्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सौरभ गर्ग म्हणाले. सन्मानपूर्वक वृद्धत्व, वृद्धांना आपल्या स्वतःच्या घरी काळ व्यतीत करता यावा आणि त्यातही उत्पादकता असावी असा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा व्यापक दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य पैलूंचा समावेश असेल.” असे त्यांनी सांगितले.
या स्थिती पत्रामध्ये केलेल्या शिफारसी आरोग्य, सामाजिक, आर्थिक/वित्तीय आणि डिजिटल या चार मुख्य क्षेत्रांतर्गत सक्षमीकरण, सेवा वितरण आणि त्यांच्या समावेशाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विशिष्ट कृतींचे वर्गीकरण करतात: ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय गरजा ओळखून त्यांच्या हितरक्षणासाठीच्या आपल्या कर्तव्यांना अधिक विस्तारत एक प्रभावी आणि समन्वयित अशी ज्येष्ठ काळजी योजना तयार करण्यासाठी बहु-आयामी धोरणाचा पुरस्कार करते.
"भारतातील ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या देखभालीत सुधारणा" हे स्थिती पत्र https://niti.gov.in/report-and-publication या संकेतस्थळावर अहवाल विभागांतर्गत वाचता येऊ शकेल.
* * *
NM/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007071)
Visitor Counter : 125