वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित कृषी निर्यातीपासून मोठी उसळी घेत अपेडाची आर्थिक वर्ष 2022-23 मधील कृषी निर्यात 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली
अपेडाच्या 38 व्या स्थापना दिनी कृषी निर्यातीने गाठला विस्तारविषयक मोठा टप्पा
Posted On:
17 FEB 2024 10:08AM by PIB Mumbai
अपेडा अर्थात कृषी तसेच प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने सक्रीय हस्तक्षेपामुळे देशातील कृषीमालाच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित वार्षिक निर्यातीपासून मोठी उसळी घेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 26.7 अब्ज डॉलर्सची उल्लेखनीय आकडेवारी गाठली आहे. निर्यातवाढीत गुणाकाराने होणारी ही वाढ 200 पेक्षा अधिक देशांमधील निर्यातविषयक विस्ताराने अधोरेखित झाली असून, त्यातून 12% चा स्तुत्य वार्षिक चक्रवाढ दर (सीएजीआर) गाठण्यात देशाला यश आले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असून देशाच्या या एकूण कृषीनिर्यातीमध्ये अपेडाचे 51% चे लक्षणीय योगदान आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये अपेडाच्या निर्यात विभागातील 23 प्रमुख कृषी उत्पादनांपैकी (पीसीज) 18 उत्पादनांनी सकारात्मक वाढ दर्शवली. उल्लेखनीय बाब अशी की, 15 मोठ्या पीसीज पैकी ज्या 13 उत्पादनांची निर्यात 100 दशलक्ष डॉलर्सहून अधिक होती त्यांनी 12 %च्या सरासरी वृद्धी दरासह सकारात्मक वाढ दर्शवली. ताज्या फळांच्या विभागाने 29% ची उल्लेखनीय वाढ नोंदवत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय, प्रक्रियायुक्त भाज्यांच्या निर्यातीने या काळात 24%ची वाढ नोंदवली असून विविध प्रक्रियायुक्त वस्तू, बासमती तांदूळ आणि ताज्या भाज्यांच्या निर्यातीमध्ये देखील गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. विशेष म्हणजे भारताने ताज्या फळांच्या निर्यातीची कक्षा महत्त्वपूर्ण पद्धतीने विस्तारली असून, गेल्या वर्षी 102 देशांमध्ये ताज्या फळांची निर्यात होत होती, त्या तुलनेत यावर्षी 111 देशांमध्ये ही निर्यात होते आहे.
अपेडाने दिनांक 13.02.2024 रोजी 38 वा स्थापना दिन साजरा केला.त्यानिमित्त कृषी निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या उल्लेखनीय प्रवासातून अपेडाने गाठलेले महत्त्वाचे टप्पे आणि अभूतपूर्व वाढीचे सादरीकरण करण्यात आले. कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसह वर्ष 1986 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने भारताच्या कृषी निर्यातीला नवी उंची गाठण्यासाठी झेप घेण्यात निर्णायक शक्ती म्हणून स्वतःला सिध्द केले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या काळात अनेक महत्त्वाच्या उत्पादनांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली, ही उत्पादने पुढीलप्रमाणे आहेत- केळी:63%, कडधान्ये (वाळवलेली आणि साले काढलेली): 110%, ताजी अंडी: 160%, केसर तसेच दशहरी आंबा: अनुक्रमे 120% आणि 140%.
एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत बासमती तांदळाचे निर्यात मूल्य 19%नी वाढले आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 3.33 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 3.97 अब्ज डॉलर्सवर पोहोचले.त्यासोबतच, निर्यातीचे प्रमाण 11 %ची लक्षणीय वाढ नोंदवत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 31.98 लाख टनांवरून यावर्षी 35.43 लाख टनांवर पोहोचले. देशातील बासमती तांदळाने जगातील प्रमुख बाजारपेठांमध्ये स्थान मिळवले असून इराण, इराक,सौदी अरेबिया, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात या पाच देशांमध्ये बासमती तांदळाची सर्वोच्च प्रमाणात निर्यात झाली आहे.ही सशक्त कामगिरी भारताच्या बासमती तांदळाची टिकाऊ लोकप्रियता आणि जागतिक मागणी अधोरेखित करते, तसेच भारताच्या निर्यातविषयक सूचीमध्ये प्रमुख कृषी उत्पादन म्हणून या तांदळाचे स्थान बळकट करते.
***
NM/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2006744)
Visitor Counter : 120