राष्ट्रपती कार्यालय
बेनेश्वर धाम येथे विविध बचत गटांशी संबंधित आदिवासी महिला मेळाव्यात राष्ट्रपतींचे संबोधन
Posted On:
14 FEB 2024 6:02PM by PIB Mumbai
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी आज (14 फेब्रुवारी, 2024) राजस्थानमधील बेनेश्वर धाम येथे राजस्थानच्या विविध बचत गटांशी संबंधित आदिवासी महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले.
भारताने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. भारतातील प्रत्येक घटक आत्मनिर्भर झाल्यावरच भारत आत्मनिर्भर होऊ शकेल असे राष्ट्रपतींनी यावेळी उद्धृत केले. आत्मनिर्भरतेला चालना दिल्याबद्दल त्यांनी बचत गटांचे आणि त्यांच्याशी निगडित प्रत्येकाचे कौतुक केले. बचत गट केवळ खेळते भांडवलच देत नाहीत तर मनुष्यबळाचे भांडवल आणि सामाजिक भांडवल उभारण्याचे प्रशंसनीय कार्य करत आहेत हे नमूद करताना त्यांनी आनंद व्यक्त केला.
आदिवासी समाजाकडून समाजातील इतर घटकांना खूप काही बोध घेता येतो. आदिवासी समाजाने स्वयंप्रशासनाची उत्तम उदाहरणे घालून दिली आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन आनंदाने कसे जगायचे हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. निसर्गाची हानी न करता कमीत कमी संसाधनांसह जगणे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. महिला सक्षमीकरणाबाबतही आपण जाणून घेऊ शकतो असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. महिलांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना दिली पाहिजे. असे केल्याने महिला देशाच्या आणि जगाच्या प्रगतीत समान भागीदार बनू शकतील. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महिला आघाडीची भूमिका बजावतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. त्यांच्या यशाच्या बळावरच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2006117)
Visitor Counter : 107