आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी उद्यामशीलतेला सशक्त बनवणे: आदि महोत्सवाच्या बिझनेस-टू-बिझनेस बैठकीने आर्थिक सहकार्याला चालना
अर्जुन मुंडा यांनी बिझनेस-टू-बिझनेस बैठकीला संबोधित करत तळागाळात आदिवासी उद्यामशीलतेला चालना देण्यासाठी सरकारची वचनबद्धता केली अधोरेखित
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाचे आणि जीवनमान सुधारण्याचे आश्वासन देत ट्रायफेडने आदिवासी शेतकरी आणि हळद पुरवठादारांना सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री जनजातीय विकास अभियाना अंतर्गत आयटीसीसह सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
Posted On:
14 FEB 2024 11:44AM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आदि महोत्सवाचा एक भाग म्हणून आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या बिझनेस-टू-बिझनेस बैठकीला केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री; कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
या बिझनेस टू बिझनेस बैठकीने उद्योजक, स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी , आदिवासी कारागीर आणि उत्पादक यांच्यात थेट संवाद घडवून आणला यामुळे असंख्य व्यावसायिक संधींचा शोध घेण्याचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात एकीकृत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला.तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील कार्यशाळा आणि परिसंवादांनी उद्योजकीय यशासाठी आवश्यक विषयांवर विचारमंथन केले. यात ब्रँडिंग संदर्भातील धोरणे, पॅकेजिंग नवोन्मेष , निधी पुरवठा आणि बाजार ओळख या विषयांचा समावेश होता.
या बैठकीने तळागाळातील आदिवासी उद्यमशीलतेला चालना देण्याची दृढ वचनबद्धता अधोरेखित केली, असे या बैठकीला संबोधित करताना अर्जुन मुंडा यांनी नमूद केले. आदिवासी व्यवहार विभागाचे सचिव विभू नायर, यांनी बी2बी बैठकीच्या महत्त्वावर भर देत विविध क्षेत्रांतील आदिवासी उद्योजकांमधील आर्थिक विकास, सहयोग आणि सक्षमीकरणासाठी उत्प्रेरक म्हणून या बैठकीची भूमिका अधोरेखित केली.
या बैठकी दरम्यान आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि कॉर्पोरेट उर्जाकेंद्र आयटीसी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आणि प्रधानमंत्री जनजातीय विकास अभियान (पीएमजेव्हीएम) योजनेंतर्गत एक सहयोगी रूपरेषा स्थापित करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उन्नतीचे आणि जीवनमान सुधारण्याचे आश्वासन देत, विशेषत: ज्या राज्यांमध्ये हळदीची लागवड होत आहे तिथल्या आदिवासी शेतकरी आणि पुरवठादारांना सशक्त करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या सामर्थ्याचा लाभ घेणे हा या कराराचा उद्देश आहे. आदिवासी महिला उद्योजकांच्या कर्तृत्वाचा सोहळा साजरा करताना, या बैठकीत ट्रायफेडच्या समर्थनासह जागतिक बाजारपेठेतील त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाचे दर्शन घडवण्यात आले तसेच त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्षमता वृद्धीसाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
लक्षवेधी चर्चा आणि नेटवर्किंगच्या संधींमध्ये 16 महामंडळ , 4 स्टार्टअप्स, 3 उद्योग महासंघ, 1 अन्न साखळी उपहारगृह, 8 एसआयए/एसएनडी आणि 5 सेंद्रिय खाद्यपदार्थ विक्रेत्यांची थेट आदिवासी कारागिरांशी सक्रिय चर्चा पाहायला मिळाली. उत्पादन क्षमता आणि खरेदीच्या संधींमधला सूक्ष्म दृष्टिकोन प्रदान करतानाच आदिवासी उत्पादनांसाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेचा विस्तार करणे हे या परस्परसंवादांचे उद्दिष्ट होते.
या बैठकीत नेटवर्किंग सहभागींद्वारे 90 विक्रेत्यांनी नोंदणी केली, मेटा प्रतिनिधींनी व्यवसाय विस्तारासाठी समाजमाध्यम मंचचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
याव्यतिरिक्त, 20 विक्रेत्यांना डिजिटल कॉमर्स ओपन नेटवर्क (ओएनडीसी ) या नेटवर्कवर यशस्वीरित्या प्रवेश देण्यात आला. हे डिजिटल एकीकरण आणि बाजार सुलभतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल अधोरेखित करते.
सुमारे 250 आदिवासी उद्योजकांचे स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या उत्पादनांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या उत्पादनांमध्ये पारंपरिक कारागिरीचे समकालीन नाविन्यपूर्ण मिश्रण आहे. बिझनेस टू बिझनेस बैठकीने नवीन सहयोग आणि भागीदारीसाठी उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावली आहे . निकोप आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या, जीवनशैली सुधारणाऱ्या आणि शाश्वत कृषी पद्धतींचा पुरस्कार करणाऱ्या भेसळविरहित, नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा मार्ग आदिवासी उत्पादक आणि कारागीरांसाठी प्रशस्त झाला आहे.
या बैठकीला अतिरिक्त सचिव नवल जीत कपूर, सह सचिव डॉ. श्री बी.एन. प्रसाद आदिवासी व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक टी. रौमुआन पायते उपस्थित होते.
***
NM/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2005885)
Visitor Counter : 97