माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील कम्युनिटी रेडीओची 20 वर्षे

Posted On: 12 FEB 2024 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024

भारतातील कम्युनिटी रेडिओची 20 वर्षे साजरी करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने 13 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात प्रादेशिक कम्युनिटी रेडिओ संमेलन (दक्षिण विभाग) आयोजित करण्यात आले आहे.देशाच्या दक्षिण भागातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेली सर्व 117 कम्युनिटी रेडिओ स्थानके या संमेलनात सहभागी होणार आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे यावेळी बीजभाषण होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन उपस्थितांसमोर विशेष भाषण करणार आहेत.

या प्रादेशिक कम्युनिटी रेडिओ संमेलनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री या क्षेत्राला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या काही धोरणात्मक बदलांविषयी घोषणा करतील अशी शक्यता आहे.

कम्युनिटी रेडिओचा भारतातील प्रवास 2002 मध्ये सुरु झाला. त्यावेळी आयआयटीज तसेच आयआयएम्स काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांना कम्युनिटी रेडिओ स्थानके सुरु करण्यासाठी परवाने देण्यासंदर्भातील धोरणाला भारत सरकारने मंजुरी दिली. कम्युनिटी रेडिओ हा त्यात्या समुदायाचे प्रतिनिधित्व करत असतो हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने नागरी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांसारख्या विनानफा संस्थांना या धोरणाच्या कक्षेत आणण्यासाठी या धोरणाचा पाया अधिक विस्तारण्याचा निर्णय सरकारने घेतला जेणेकरून विकास तसेच सामाजिक बदल यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर नागरी समाजाला जास्त प्रमाणात सहभागी होता यावे.

परिणामस्वरूप, भारत रत्न एल.के.अडवाणी यांनी 1 फेब्रुवारी 2004 रोजी भारतातील पहिल्या कम्युनिटी रेडिओ स्थानकाचे उद्घाटन केले. इतर समुदायाधारित संस्थांना देखील कम्युनिटी रेडिओ केंद्रे सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर, आधी कमी वेगाने सुरु झालेल्या या प्रवासाने चांगलीच गती घेतली.

गेल्या काही वर्षामध्ये सरकारने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्यासाठीच्या अर्जांच्या सादरीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यासह या क्षेत्रात काम करण्यातील सुलभता आणण्यासाठी, अनेक सक्रीय पावले उचलली आहेत.त्यामुळे गेल्या दोन वर्षांत नव्याने सुरु झालेल्या 155 केंद्रांसह देशात कार्यरत कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या आता 481 वर पोहोचली आहे.गेल्या 9 वर्षांमध्ये या क्षेत्राचा लक्षणीय विकास झाला असून वर्ष 2014 मध्ये कार्यरत असलेल्या 140 कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या वाढून वर्ष 2023 मध्ये 481 पर्यंत वाढली आहे.

उद्या, 13 फेब्रुवारी रोजी असलेल्या ‘जागतिक  रेडिओ दिनानिमित्त प्रादेशिक संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

कम्युनिटी रेडिओ हा सरकारी रेडिओ प्रसारण आणि व्यावसायिक रेडिओपासून वेगळा असणारा  रेडियो प्रसारणातील महत्त्वाचा तिसरा स्तंभ आहे. कम्युनिटी रेडिओ केंद्रे (सीआरएसएस)ही कमी क्षमतेची रेडिओ केंद्रे असून त्याची स्थापना तसेच परिचालन स्थानिक समुदायांतर्फे होत असते.

आरोग्य,पोषण, शिक्षण, कृषी इत्यादी घटकांच्या संदर्भातील समस्या यांच्याबाबतीत स्थानिक जनतेला असलेल्या समस्या मांडण्यासाठी कम्युनिटी रेडिओ एक मंच पुरवते. तसेच समाजातील वंचित घटकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे एक सशक्त माध्यम झाले आहे. तसेच या रेडिओचे प्रसारण स्थानिक भाषा आणि बोलीमध्ये असल्याने लोकांना या रेडिओला स्वीकारणे सोपे झाले आहे.

कम्युनिटी रेडिओ सेवेमध्ये त्याच्या समग्र दृष्टीकोनासह विकास कार्यांमध्ये लोकांचा सहभाग अधिक मजबूत करण्याची क्षमता देखील आहे. भारतासारख्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी बोलीभाषा तसेच वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. अशात सीआरएसएस हे स्थानिक लोकसंगीत आणि सांस्कतिक वारसा जपणारे भांडार म्हणून कार्यरत आहेत. अनेक सीआरएस वंशपरंपरांचे जतन करण्याच्या दृष्टीने स्थानिक गीते रेकॉर्ड करून त्यांचे जतन करून ठेवतात तसेच स्थानिक कलाकारांना त्यांच्या प्रतिभेचे समुदायाला दर्शन घडवण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देतात. सकारात्मक सामाजिक बदलाचे साधन म्हणून सीआरएसचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान सीआरएसना समुदायाच्या सशक्तीकरणाचे आदर्श साधन बनवते.

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2005396) Visitor Counter : 135