श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची(सीबीटी) 2023-24 या वर्षासाठी ईपीएफ सदस्यांना 8.25% व्याजदराची शिफारस

Posted On: 10 FEB 2024 12:51PM by PIB Mumbai

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 235व्या बैठकीचे केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 10 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले. या बैठकीला उपाध्यक्ष आणि  केंद्रीय श्रम आणि कामगार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली, सहउपाध्यक्ष आरती आहुजा, श्रम आणि रोजगार सचिव आणि सदस्य सचिव नीलम शामी राव, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत केंद्रीय मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ सदस्यांकडून जमा होणाऱ्या रकमेवर 8.25% दराने व्याज त्यांच्या खात्यात जमा करावे अशी शिफारस केली. या व्याजदराची अधिकृत अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ईपीएफओकडून या मंजूर दराची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा करेल.

मंडळाने ईपीएफ सदस्यांच्या खात्यात एकूण 13 लाख कोटी रुपयांच्या मुद्दल रकमेवर 1,07,000 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उत्पन्नाच्या वितरणाची शिफारस केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात मुद्दल रक्कम 11.02 लाख कोटी आणि व्याजाची रक्कम 91,151.66 कोटी रुपये होती. वितरणासाठी शिफारस करण्यात आलेले उत्पन्न आतापर्यंत नोंद झालेले सर्वोच्च उत्पन्न आहे.

आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत  लक्षणीय वृद्धी झाली आहे. उत्पन्नात 17.39% पेक्षा जास्त आणि मुद्दलाच्या रकमेत 17.97% नी वाढ झाली आहे. यातून भक्कम आर्थिक कामगिरी आणि संभाव्य भक्कम परतावा सूचित होत आहे. आपल्या सदस्यांना विवेकाने उच्च उत्पन्न देण्याचा ईपीएफओचा लौकिक आहे. सदस्यांना उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत ईपीएफओकडून दिला जाणारा व्याजदर उच्च राहिला आहे. यातून ईपीएफओच्या गुंतवणुकीतून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या स्वरुपाबाबतचा तसेच आपल्या सदस्यांना आकर्षक परतावा देण्याबाबतचा आत्मविश्वास दिसून येत आहे.

***

H.Akude/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2004800) Visitor Counter : 99


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali