संरक्षण मंत्रालय

जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 मधे सहभागी होण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट रियाध दौऱ्यावर


विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सौदीचे संरक्षण मंत्री आणि सहाय्यक संरक्षण मंत्र्यांशी केली चर्चा

Posted On: 07 FEB 2024 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या संरक्षण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असलेल्या जागतिक संरक्षण प्रदर्शन (डब्ल्यू. डी. एस.) 2024 साठी भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट रियाध दौऱ्यावर आहेत. या पाच दिवसीय प्रदर्शनाला 4 फेब्रुवारी 2024 रोजी सुरुवात झाली. यात सहभागी कंपन्यांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करत संरक्षण तंत्रज्ञानातील ताज्या प्रगतीचे हे निदर्शक आहे.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 6 फेब्रुवारी 2024 रोजी सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल-सौद यांची भेट घेतली. त्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. अजय भट्ट यांनी सौदी अरेबियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री डॉ. खालिद अल-बायारी यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन आणि बहुआयामी संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर उभयतांनी चर्चा केली.

याव्यतिरिक्त, संरक्षण राज्यमंत्र्यांनी सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर मिलिटरी इंडस्ट्रीज (जीएएमआय) चे गव्हर्नर अहमद अब्दुलअझीझ अल-ओहाली यांची भेट घेतली. विशिष्ट तंत्रज्ञानाव्यतिरिक्त संरक्षण उत्पादन, संशोधन आणि विकास या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याच्या दिशेने पुढील मार्गांवर त्यांनी चर्चा केली. डब्ल्यू. डी. एस. 2024 च्या पार्श्वभूमीवर त्यांनी सौदी अरेबियन मिलिटरी इंडस्ट्रीजच्या (एस. ए. एम. आय.) विभागालाही भेट दिली.

भारत-सौदी अरेबिया यांच्यातील भागीदारी अधिकाधिक बळकट होत जाईल आणि प्रादेशिक स्थिरता तसेच जागतिक सुरक्षेत ती लक्षणीय योगदान देईल असा विश्वास अजय भट्ट यांनी व्यक्त केला.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी संरक्षण प्रदर्शनात सहभागी झालेल्या भारतीय संरक्षण कंपन्यांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला आणि त्यांच्या प्रभावी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांसाठी त्यांचे अभिनंदन केले.

डब्ल्यू. डी. एस. 2024 च्या पार्श्वभूमीवर म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड आणि त्याचा स्थानिक भागीदार यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावेळीही अजय भट्ट उपस्थित होते.

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2003459) Visitor Counter : 97