पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पाली संसद खेळ महाकुंभला केले संबोधित


खेळात कधीही पराभव होत नाही;  तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता

"खेळांबद्दलची सरकारची भावना मैदानावर खेळाडूंच्या भावनेतून प्रतिध्वनित होते"

“राजस्थानच्या धाडसी तरुणांनी सातत्याने देशाचा गौरव वाढवला आहे”

"उत्कृष्टतेला मर्यादा नसते ही शिकवण आपल्याला खेळांमधून मिळते, म्हणूनच आपण आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न केले पाहिजेत"

"राजस्थानमधील लोकांना सशक्त करणे आणि त्यांच्या जीवनात सुलभता आणणे, हेच डबल-इंजिन सरकारचे उद्दिष्ट"

Posted On: 03 FEB 2024 12:34PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे पाली संसद खेल महाकुंभाला संबोधित केले.  सर्व स्पर्धकांनी त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. खेळात कधीही पराभव होत नाहीतुम्ही एकतर जिंकता किंवा काहीतरी शिकता, त्यामुळे मी केवळ सर्व खेळाडूंनाच नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षकांना आणि उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनाही माझ्या शुभेच्छा देतो.असे पंतप्रधान म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी युवक आणि राष्ट्राच्या विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. संसद खेल महाकुंभमध्ये दिसणारा उत्साह आणि आत्मविश्वास आज प्रत्येक खेळाडूची आणि प्रत्येक तरुणाची ओळख बनला आहे. खेळांबद्दलची सरकारची भावना मैदानावरील खेळाडूंच्या भावनेतून प्रतिध्वनित होते असेही ते म्हणाले. अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी विद्यमान सरकारच्या सततच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले की संसद खेल महाकुंभ जिल्हा आणि राज्यांमधील लाखो प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ प्रदान करत आहे. हा महाकुंभ नव्या आणि उगवत्या प्रतिभेचा शोध घेण्याचे तसेच प्रतिभेची जोपासना करण्याचे माध्यम बनले आहे.  यावेळी पंतप्रधानांनी महिलांना समर्पित असलेल्या स्पर्धेच्या आयोजनाचाही विशेष उल्लेख केला.

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद खेल महाकुंभात पाली येथील 1100 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांसह 2 लाखांहून अधिक खेळाडूंच्या सहभागाची  प्रशंसा केली. या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूंना मिळालेल्या  प्रदर्शनाच्या संधीचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी पाली येथील खासदार पी. पी. चौधरी यांचे त्यांनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांसाठी अभिनंदन केले.

राजस्थान आणि राष्ट्राच्या तरुणाईला आकार देण्यात खेळांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर देऊन पंतप्रधान म्हणाले की, “राजस्थानच्या धाडसी तरुणांनी सशस्त्र दलातील त्यांच्या सेवेपासून ते क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीपर्यंत सातत्याने देशाचा गौरव वृद्धिंगत केला आहे.  मला विश्वास आहे की तुम्ही, क्रीडापटू, हा वारसा असाच पुढे चालवत राहाल.

खेळांचे सौंदर्य केवळ जिंकण्याची सवय जोपासण्यात नाही तर आत्म-सुधारणेचा सतत प्रयत्न करण्यात देखील आहे, असे पंतप्रधान खेळांच्या परिवर्तनीय शक्तीवर प्रकाश टाकताना म्हणाले.  खेळ आपल्याला शिकवतात की उत्कृष्टतेला मर्यादा नसते ही शिकवण आपल्याला खेळांमधून मिळते आणि म्हणूनच आपण आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “खेळातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तरुणांना विविध दुर्गुणांपासून दूर नेण्याची क्षमता, असे पंतप्रधानांनी सांगितले.  खेळ लवचिकता निर्माण करतात, एकाग्रता वाढवतात आणि आपल्याला ध्येयाप्रति एकाग्र ठेवतात.  त्यामुळे वैयक्तिक विकासात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात." असेही ते म्हणाले

युवक कल्याणासाठी सरकारची कटिबद्धता अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “सध्याचे सरकार, ते राज्यातील असो किंवा केंद्र स्तरावरील, तरुणांच्या हिताला प्राधान्य देते.  खेळाडूंना अधिक संधी देऊन, निवड प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करून आणि संसाधनांचे वाटप करून सरकारने भारतीय खेळाडूंना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

पंतप्रधानांनी गेल्या दशकात क्रीडा अर्थसंकल्पात तिप्पट वाढ, तसेच TOPS सह विविध योजनांतर्गत शेकडो खेळाडूंना आर्थिक मदतीची तरतूद आणि देशभरात अनेक क्रीडा केंद्रांची स्थापना यावर प्रकाश टाकला.  खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा अंतर्गत, 3,000 हून अधिक खेळाडूंना दरमहा 50,000 रुपयांची मदत केली जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  देशाच्या दुर्गम भागातील लाखो खेळाडू सुमारे 1,000 खेलो इंडिया केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 100 हून अधिक पदके जिंकत अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात  युवक केंद्रस्थानी असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  रस्ते आणि रेल्वे यासारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सर्वाधिक फायदा तरुणांना होईल.  40,000 वंदे भारत सारख्या रेल्वे डब्यांच्या निर्मितीची घोषणा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या उपक्रमांचा सर्वात मोठा लाभ आपल्या तरुणांना होणार आहेयावर पंतप्रधानांनी भर दिला.

रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, उद्योजकतेला चालना देणे आणि क्रीडेसह विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाला चालना देण्याच्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  त्यांनी स्टार्टअप्सना कर सवलत देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

याशिवाय, पंतप्रधानांनी पालीमध्ये हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना अधोरेखित केले. यामध्ये सुमारे 13,000 कोटी रुपयांची रस्ते बांधणी, रेल्वे स्थानक, पुलांचा विकास आणि 2 केंद्रीय विद्यालय, पारपत्र केंद्र आणि वैद्यकीय महाविद्यालय यासह शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रांची स्थापना यांचा समावेश आहे.  "या उपक्रमांचा उद्देश पालीमधील लोकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी हातभार लावणे आहे", असे ते म्हणाले.

भाषणाच्या समारोपात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासात्मक उपक्रमांद्वारे राजस्थान आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला, विशेषत: तरुणांना सक्षम बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  त्यांनी युवकांमध्ये दृढनिश्चय आणि लवचिकतेची भावना वाढवण्यासाठी खेळांच्या भूमिकेवर जोर दिला. हेच गुण देशाच्या प्रगती आणि समृद्धीमध्ये योगदान देण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2002240) Visitor Counter : 82