राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते 37 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन

Posted On: 02 FEB 2024 5:40PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (2 फेब्रुवारी, 2024) हरियाणातील सूरजकुंड येथे 37 व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन केले.

सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हा आपल्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव आहे. हा मेळा म्हणजे आपल्या परंपरेचा तसेच नवोन्मेषाचा उत्सव आहे. आपल्या कारागिरांना कलाप्रेमींशी जोडण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. हा मेळा कला प्रदर्शनाबरोबरच व्यवसाय केंद्रही आहे असे यावेळी राष्ट्रपतींनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की कला आणि हस्तकला सीमा ओलांडून सामंजस्याचे सेतू बांधतात. कलाकार आणि हस्तकलाकार हे मानवतेचे सर्जनशील राजदूत आहेत. यंदाच्या मेळ्याचे भागीदार असलेल्या गुजरात राज्याला कलेची खूप समृद्ध परंपरा आहे हे सांगताना त्यांनी ईशान्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळ यंदाच्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्यात सांस्कृतिक भागीदार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

आपल्या देशाचा कलात्मक वारसा जपल्याबद्दल राष्ट्रपतींनी कारागिरांचे कौतुक केले. कारागीर आणि शिल्पकार माती आणि दगडात चैतन्य आणतात. चित्रकार विविध रंगांच्या माध्यमातून चित्रे चितारतात. कारागीर विविध धातू आणि लाकडासारख्या घन पदार्थांपासून अलौकिक आकार आणि रूपे साकारतात. कल्पनाशील विणकर कापड आणि वस्त्रांमध्ये अप्रतिम सौंदर्य निर्माण करतात. असे कारागीर भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीचे जनक आणि तारणहार आहेत असे मत त्यांनी मांडले. आजचे कारागीर बंधू-भगिनी आपल्या सभ्यता आणि संस्कृतीचा अनमोल वारसा पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टांझानिया हे यावर्षीच्या मेळ्याचे भागीदार राष्ट्र असल्याचे नमूद करताना राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. टांझानियन नृत्य, संगीत आणि पाककृतीचे प्रदर्शन करण्यासाठी हे एक अद्भुत व्यासपीठ आहे, ज्यामध्ये भारत आणि पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील लोकांमध्ये शतकानुशतके असलेल्या परस्पर संपर्कामुळे आपण येथे भारतीय प्रभाव देखील अनुभवू शकतो असे त्यांनी सांगितले. या मेळ्यातील भागीदार राष्ट्र म्हणून टांझानियाचा सहभाग आफ्रिकन युनियनसोबत भारताच्या सहभागावर प्रकाश टाकतो हे त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2002094) Visitor Counter : 83