अर्थ मंत्रालय
पायाभूत सुविधांच्या विकास खर्चासाठी 11.1 टक्के वाढीसह 11,11,111 कोटी रुपये तरतूद
पीएम गति शक्ती अंतर्गत निवडलेल्या रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पांची होणार अंमलबजावणी
विद्यमान विमानतळांचा विस्तार आणि नवीन विमानतळांच्या विकासाला गती देणार
मेट्रो रेल्वे आणि नमो भारत - शहरी परिवर्तनासाठी उत्प्रेरक
Posted On:
01 FEB 2024 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
संसदेत आज वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सुविधांच्या खर्चासाठी 11.1 टक्के वाढीसह 11,11,111 कोटी रुपये तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला . हा जीडीपीच्या 3.4 टक्के असेल. तरतुदीतील या वाढीमधून आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीवरील पायाभूत सुविधांच्या विकासाचा मोठा प्रभाव प्रतिबिंबित होतो.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की पीएम गति शक्ती अंतर्गत निवडण्यात आलेल्या तीन प्रमुख आर्थिक रेल्वे कॉरिडॉर कार्यक्रमांची अंमलबाजवणी केली जाईल. हे कॉरिडॉर पुढीलप्रमाणे आहेत (i) ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर; (ii) बंदर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि (iii) सर्वाधिक वाहतूक असलेला कॉरिडॉर.या प्रकल्पांमुळे केवळ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी सक्षम होणार नाही तर लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारतील आणि खर्च कमी होईल. प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा आणि सोय वाढवण्यासाठी 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारत मानकांनुसार परिवर्तित केले जातील असे त्या म्हणाल्या.
गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढून 149 झाली आहे असे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले. उडान योजनेद्वारे अधिक संख्येने शहरे हवाई मार्गाने जोडली गेली आहेत. यामुळे भारतीय विमान कंपन्यांनी 1000 हून अधिक नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे असे त्यांनी नमूद केले.
त्या पुढे म्हणाल्या की, विद्यमान विमानतळांचा विस्तार आणि नवीन विमानतळांच्या विकासाला गती दिली जाईल.
मेट्रो रेल्वे आणि नमो भारत रेल्वे प्रणाली मोठ्या शहरांच्या विस्ताराला विशेषत: एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या विकासाला बळ देईल असे सीतारामन म्हणाल्या.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001653)
Visitor Counter : 133