माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या 450 हून अधिक विशेष निमंत्रितांचा केला सत्कार
Posted On:
26 JAN 2024 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2024
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज कर्तव्यपथावर 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानिमित्त आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 450 हून अधिक विशेष निमंत्रितांची भेट घेतली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या निमंत्रितांचा राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पद्म पुरस्कार विजेत्यांचा समावेश असलेल्या या निमंत्रितांनी पर्यावरण, पारंपारिक कला आणि संस्कृतीचे जतन, समाजातील मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या निमंत्रितांबद्दल बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “यापैकी काही जणांना कधी दिल्लीला यायलाही जमले नव्हते, मात्र आज पंतप्रधानांचे विशेष पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.” ते पुढे म्हणाले की, “या निमंत्रितांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या "मन की बात" कार्यक्रमामध्ये केला होता आणि हे निमंत्रण म्हणजे सरकारच्या विचारसरणीला बळ देणाऱ्या वेगळ्या विचारप्रक्रियेचे प्रदर्शन आहे.
पाहुण्यांना संबोधित करताना ठाकूर म्हणाले की, “त्यांचे कार्य आणि त्यांचे योगदान हीच आज त्यांची ओळख बनली आहे. त्यांनी कोणताही पुरस्कार मिळवण्यासाठी काम केले नाही, याउलट भारताला पुढे नेण्यात योगदान दिले”,असेही ते म्हणाले. ही ओळख या लोकांना आपापल्या क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यास प्रोत्साहन देईल , अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भूपेंद्र यादव यांनी या सन्मान समारोहात सांगितले की, पंतप्रधानांनी देशाच्या जडणघडणीत भारतातील सामान्य लोकांचे योगदान आणि राष्ट्र उभारणीत त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे.
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999957)
Visitor Counter : 117