गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज आसाममधील तेजपूर येथे सशस्त्र सीमा बलाच्या 60 व्या स्थापना दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2024 4:41PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आसाममधील तेजपूर येथील एसएसबी भर्ती प्रशिक्षण केंद्रा सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) 60 व्या स्थापना दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय गृहसचिव, एसएसबीचे महासंचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या दलातील 51 जवानांना यावेळी गृहमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात एसएसबीच्या पाच जवानांनी आपले कर्तव्य बजावताना प्राणाचे बलिदान दिले. देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार असलेल्या सैनिकांमुळेच देश निर्धास्तपणे झोपू शकतो, असेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परमवीर चक्र पुरस्कार विजेते करम सिंह जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि म्हणाले की करम सिंह जी यांनी महान शौर्य गाजवत आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या स्मरणार्थ अंदमान आणि निकोबार बेटांमधील एका बेटाला करम सिंह बेट म्हणून नाव दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आज एसएसबीशी संबंधित 226 कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे, ज्यामध्ये 45 व्या बटालियनचे मुख्यालय वीरपूर, 20 व्या बटालियनचे मुख्यालय सीतामढी, राखीव बटालियनचे मुख्यालय बारासात येथील गृह प्रकल्प, बॅरेक, खानावळ, रुग्णालये आणि क्वार्टर गार्ड, स्टोअर्स आणि गॅरेज अशा इतर विविध सुविधांचाही समावेश आहे. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसएसबीसह सर्व केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलातील (सीएपीएफ) सुविधा सुधारण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत अनेक पावले उचलली आहेत.

सीमा सुरक्षा बलाने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. एसएसबीने 2026 सालापर्यंत दलातील महिला कर्मचार्यांची संख्या सहा टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि आतापर्यंत 4 टक्के एवढे लक्ष्य गाठले आहे, असे त्यांनी नमूद केले.

व्हायब्रंट व्हिलेज योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा भागातील गावांना दिलेली भेट आहे, असे ते म्हणाले. सीमा भागातील गावे ही देशातील शेवटची गावे नसून देशाची पहिली गावे आहेत आणि तिथूनच देशाची सुरुवात होते, अशी नवी संकल्पना घेऊन ही योजना आखण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) योजने अंतर्गत या दलातील 40 लाखापेक्षा जास्त कर्मचार्यांना आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात आले आहे, तसेच गृहनिर्माण योजनेंतर्गत गेल्या 5 वर्षांत 11,000 नवीन घरे बांधण्यात आली आहेत तर सुमारे 52,000 रिकामी घरे ई-आवास पोर्टलद्वारे वाटप करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे लाभ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावेत, यासाठी ही योजना अधिक पद्धतशीररित्या राबवण्यात येते आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998197)
आगंतुक पटल : 167