संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यंत्र आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आजच्या युगात प्रासंगिक राहायचे असल्यास, सर्जनशीलता, परस्परसंवाद कौशल्य आणि संवेदनशीलता अत्यावश्यक असून, राष्ट्रीय छात्र सेनेत केडेट्सना याच गुणांसह सिद्ध केले जाते: एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 20 JAN 2024 1:28PM by PIB Mumbai

 

यंत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या युगात, कोणालाही प्रासंगिक आणि रोजगार मिळण्यास पात्र राहायचे असेल, तर, सर्जनशीलता, परस्पर संवाद कौशल्य, भावनिक बुद्धी आणि संवेदनशीलता असणे अत्यंत महत्वाचे आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. दिल्ली कंटोनमेंट परिसरात सुरू असलेल्या, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला त्यांनी आज (20 जानेवारी 2024) भेट दिली, त्यावेळी एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय छात्र सेना, आपल्या विद्यार्थ्यांना हीच कौशल्ये शिकवून सज्ज करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आजच्या तंत्रज्ञान प्रणित युगात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झालेल्या उदयाबद्दल आपले विचार व्यक्त करताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की जसा काळ आणखी पुढे जाईल, तसतसे लोक अशा क्षेत्रात करियर करण्याचा अधिकाधिक विचार करतील, जिथे यंत्रे तुम्हाला इच्छित असलेले कार्य करण्यास सक्षम असणार नाही. यंत्रे भौतिक आणि बौद्धिक कामे करु शकली तरी ती सर्जनशील असू शकत नाही, त्यांच्या ठायी सद्सद्विवेक जागा होऊ शकत नाही आणि माणसांप्रमाणे परस्पर संवादाचे कौशल्य विकसित करु शकत नाहीत. आणि म्हणूनच, अशा ठिकाणी, एनसीसीची भूमिका महत्वाची ठरते, असे त्यांनी नमूद केले.

एनसीसीने, आपल्या अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल हे सुनिश्चित केले आहे. त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत करण्याचे, त्यांची सामाजिक कौशल्ये विकसित करण्याचे काम केले आहे, त्यांच्यात देशभक्ती आणि राष्ट्राप्रती अभिमान जागवण्याचे काम केले आहे. अभ्यासासोबतच, कॅडेट्समध्ये ही सगळी गुणवैशिष्ट्ये आणि कौशल्ये विकसित करणेही आवश्यक असते. यातूनच त्यांना देशाच्या प्रगतीत आपले 100 टक्के योगदान देणे शक्य होईल.

याप्रसंगी राजनाथ सिंह यांच्या हस्ते, एनसीसी कॅडेट्सना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणासाठी संरक्षण मंत्री पदक आणि प्रशंसा पत्रे प्रदान करण्यात आली. यावर्षी, कर्नाटक आणि गोवा संचालनालयाचे वरिष्ठ अवर अधिकारी मक्कातिरा कल्पना कुट्टप्पा, आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख संचालनालयाचे कनिष्ठ अवर अधिकारी डेचेन चुस्कित यांना संरक्षण मंत्री पदके प्रदान करण्यात आली. ईशान्य प्रदेश संचालनालयाचे अवर अधिकारी अमर मोरंग आणि उत्तर प्रदेश संचालनालयाचे वरिष्ठ अवर अधिकारी ज्योतिर्मय सिंग चौहान यांनाही संरक्षण मंत्री प्रशंसापत्रे देण्यात आली. देशाच्या विविध प्रदेशातून आलेल्या या कॅडेट्सचा सहभाग हा एक भारत, श्रेष्ठ भारतचे उत्तम उदाहरण आहे”, असे राजनाथ सिंह म्हणाले.

एनसीसी कॅडेट्सनी यावेळी, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर पाहुण्यांसमोर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. कॅडेट्सची ऊर्जा आणि उत्साहाचे विशेष कौतुक करत, त्यांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

त्याआधी, संरक्षणमंत्र्यांनी एनसीसीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅडेट्सनी सादर केलेल्या मानवंदनेचा आढावा घेतला. त्यानंतर ग्वाल्हेरच्या द सिंधिया स्कूलने बँड सादरीकरण केले. विविध सामाजिक जागृती संकल्पनांचे चित्रण करणाऱ्या 17 एनसीसी संचालनालयांच्या फ्लॅग एरियालाही त्यांनी भेट दिली. त्याशिवाय, माजी विद्यार्थ्यांची छायाचित्रे, मॉडेल्स तसेच गेल्या 75 वर्षांतील एनसीसीच्या इतर कामगिरीचा संग्रह असलेल्या  'हॉल ऑफ फेम' ला त्यांनी भेट दिली. एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग, आणि एनसीसी आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998101) Visitor Counter : 105


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu