संरक्षण मंत्रालय

कर्तव्यपथ येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला केंद्रीत असणार ; 'विकसित भारत' आणि 'भारत - लोकतंत्र की मातृका ' या प्रमुख संकल्पना असतील: संरक्षण सचिव गिरीधर अरमाने


प्रथमच , 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्यांसह संचलनाची सुरुवात केली जाईल; 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये/संघटनांचे चित्ररथ देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगती प्रदर्शित करणार

Posted On: 19 JAN 2024 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024

‘विकसित भारत’ आणि ‘भारत - लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथ येथे होणारे 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला-केंद्रित असेल. 19 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने म्हणाले की, महिला संचलन करणार्‍या तुकड्या या संचलनाचा प्रमुख भाग असतील , ज्यात राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/संघटना यांचे बहुतांश चित्ररथ देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगतीची झलक  प्रदर्शित करतील. ‘भारत ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची जननी आहे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या अनुषंगाने संकल्पनांची निवड करण्यात आल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

प्रथमच  100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्यांसह संचलनाला  सुरुवात होईल. महिला कलाकारांद्वारे शंख , नादस्वरम, नगाडा वाजवून या संचलनाची सुरुवात केली जाईल. या संचलनात प्रथमच कर्तव्यपथावरून कूच करणारी तिन्ही सेनादलातील सर्व महिलांचे पथक पहायला मिळणार आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल.

संचलनाला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होईल आणि ते सुमारे 90 मिनिटे चालेल.

प्रमुख पाहुणे

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे गिरीधर अरमाने म्हणाले . फ्रान्समधील 95 सदस्यांचे  मार्चिंग पथक आणि  33 सदस्यांचे  बँड पथकही या संचलनात  सहभागी होणार आहेत. फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानासह, एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट  विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होणार आहेत.

विशेष पाहुणे

यावर्षी सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांना प्रजासत्ताक  दिवस संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

या विशेष पाहुण्यांमध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.  व्हायब्रंट गावांचे सरपंच;स्वच्छ भारत अभियान, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील महिला कर्मचारी, इस्रोच्या महिला अंतराळ शास्त्रज्ञ, योग शिक्षक (आयुष्मान भारत), आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते आणि पॅरालिम्पिक पदक विजेते यांच्या सोबतीने सर्वोत्कृष्ट बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात संदर्भ आलेल्या व्यक्ती तसेच प्रकल्प वीर गाथा 3.0 चे 'सुपर-100' आणि राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचे विजेते देखील संचलन पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हे विशेष पाहुणे कर्तव्यपथावर विशेष आसन व्यवस्थेत विराजमान होतील.

व्हायब्रंट गावांची खडतर उपजीविका पाहता देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग व्हावा यासाठी या गावांचा विशेष अतिथींच्या यादीत समावेश करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहिती गिरीधर अरमाने  यांनी दिली.

चित्ररथ

एकूण 25 चित्ररथ - 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच नऊ मंत्रालये किंवा विभागांचे चित्ररथ संचलनादरम्यान कर्तव्य पथावर उतरतील. यात महाराष्ट्र्राचाही समावेश आहे.

विशेष नाणी आणि टपाल तिकीटे

राष्ट्र या वर्षी आपल्या प्रजासत्ताकचे 75 वे वर्ष साजरे करत असताना या उत्सवादरम्यान संरक्षण मंत्रालय एक विशेष नाणे आणि टपाल तिकिट जारी करेल.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारे कार्यक्रम

प्रघातानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक,  चित्ररथ कलाकार, आदिवासी पाहुणे इत्यादींची भेट घेतील.

S.Kakade/S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1997924) Visitor Counter : 347