राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्नचे नेतृत्व करणाऱ्या महिलांशी राष्ट्रपतींचा संवाद


तुम्ही केवळ एक व्यावसायिक नेतृत्वच नाही;तुम्ही बदलाच्या अग्रदूत आहात : राष्ट्रपती मुर्मू यांचे महिला उद्योजकांसमोर प्रतिपादन

Posted On: 18 JAN 2024 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 जानेवारी, 2024) राष्ट्रपती भवनात आघाडीच्या स्टार्ट-अप आणि युनिकॉर्नच्या संस्थापक आणि सह-संस्थापक असलेल्या महिलांच्या समूहाशी संवाद साधला. लोकांशी अधिक दृढ  संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांचे योगदान ओळखणे हे उद्दिष्ट असलेल्या जनतेसोबत राष्ट्रपती या उपक्रमांतर्गत हा संवाद झाला.

महिला उद्योजकांनी भारतीय व्यावसायिक वातावरण बदलून टाकले आहे, असे राष्ट्रपती महिला उद्योजकांशी संवाद साधताना म्हणाल्या. ‘स्टार्ट-अप इंडिया’ हा कार्यक्रम आपल्या तरुणांच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी आणि देशातील उद्यमशील वातावरण पोषक   करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे , हे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी या महिलांचे  कौतुक केले. या महिलांसारख्या युवा वर्गाच्या नवोन्मेषी  प्रयत्नांमुळे, आज भारतात सुमारे 1,17,000 स्टार्ट-अप्स  आणि 100 हून अधिक युनिकॉर्नसह जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट-अप कार्यक्षेत्र  आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्योजक म्हणून या महिलांचा  प्रवास आणि यश हे लोकांसाठी, विशेषतः महिला आणि तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सपासून ते सामाजिक उपक्रमांपर्यंत, त्यांचे कार्य उद्योजकतेच्या जगात भारतीय महिलांच्या क्षमतांच्या विविध पैलूंसंदर्भात सूक्ष्म दृष्टिकोन प्रदान करते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.  या महिलांचे योगदान केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित नाही. त्यांनी पारंपरिक प्रतिबंध मोडून  भावी पिढ्यांना सक्षमीकरणाचा मार्ग दाखवला आहे, असावं राष्ट्रपतींनी नमूद केले. जिथे प्रगतीचा मार्ग लिंगाच्या आधारावर नाही तर प्रतिभा आणि महत्त्वाकांक्षेच्या आधारावर प्रशस्त  झाला आहे ,त्या सर्वसमावेशक आर्थिक भविष्याच्या या महिला  शिल्पकार आहेत, असे त्या म्हणाल्या.या महिला  केवळ व्यावसायिक नेतृत्वच करत नाहीत तर त्या त्या बदलाच्या अग्रदूत आहेत.  प्रगती आणि विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणींसाठी त्या आदर्श आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

इतर उद्यमशील  महिलांना ओळखून  त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात त्यांना पाठिंबा देण्यासाठी नव्या मार्गांचा विचार करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी उपस्थित महिला उद्योजकांना केले. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक महिला आहेत, परंतु हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग स्वीकारावा हे त्यांना माहीत नाही. या महिलांच्या  यशाचा प्रभाव सर्वदूर पोहोचला तर  देशाच्या सर्व भागांतून अशा यशोगाथा ऐकू  येतील, असे राष्ट्रपतींनी सांगितले.   जिथे प्रत्येक महिला सक्षम असेल आणि प्रत्येक तरुणी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाईल  अशा भारताच्या निर्मितीसाठी , आपण एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1997391) Visitor Counter : 94