सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकारी संस्था निबंधक (सीआरसीएस) कार्यालयाच्या नव्या इमारतीचे केले उद्घाटन
केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ संकल्पाला बळ मिळेल : अमित शाह
मोदी सरकारच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्ट पूर्तीमध्ये सहकार क्षेत्र महत्वाचे भागीदार बनेल असा केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा विश्वास
Posted On:
17 JAN 2024 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकारी संस्था निबंधक (सीआरसीएस) कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले.
आपल्या भाषणामध्ये अमित शाह म्हणाले की, सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पाला बळ देईल. मोदी सरकारच्या कार्यकाळातील नवीन कायदे, नवीन कार्यालये आणि नवीन पारदर्शक व्यवस्थेमुळे आज सहकार क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर दोन वर्षांनी बहुराज्यीय सहकारी संस्था कायद्यातील 98 व्या दुरुस्तीनुसार सर्व परिवर्तन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोदी सरकारने सहकारी संस्थांच्या कामकाजातील विविध प्रकारच्या विसंगती दूर करण्यासाठी 2023 मध्ये कायदा करून पारदर्शक सहकार्यासाठी मजबूत आराखडा तयार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांचे मोठे योगदान आपण सुनिश्चित करू असे ते म्हणाले. सहकार मंत्रालय पंतप्रधान मोदी यांचे विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, सहकार क्षेत्रात मागील वर्षांमध्ये अनेक अभूतपूर्व कामे झाली आहेत. सहकार क्षेत्राने आपली विश्वासार्हता गमावली, तर त्याचा विस्तार होणार नाही आणि त्याचे अस्तित्व धोक्यात येईल, असे ते म्हणाले.
देशात सर्व क्षेत्रांमध्ये सहकाराने प्रगती केल्याचे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की मोदी सरकारने देशात 2 लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्थांची (पीएसीएस) नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे, त्यापैकी 12000 हून अधिक पीएसीएस ची नोंदणी झाली असून, आम्ही नियोजित वेळेपूर्वी 2 लाख बहु-उद्देशीय पीएसीएस ची नोंदणी करू. केंद्रीय मंत्री शाह पुढे म्हणाले की, बहुराज्य सहकारी पतसंस्थांनी स्वतःचे बँकांमध्ये रुपांतर करण्यासाठी सज्ज राहायला हवे. ते म्हणाले की, 2020 मध्ये 10, तर 2023 मध्ये 102 नवीन बहुराज्य सहकारी संस्थांची नोंदणी झाली असून, नोंदणीमध्ये 10 पट वाढ झाली आहे.
ते म्हणाले की, आपल्याला या परिवर्तनाला गती द्यावी लागेल, आणि अधिकाधिक बँका बहुराज्य व्हाव्यात आणि अधिकाधिक बहुराज्य सहकारी संस्था आणि पतसंस्थांचे बँकांमध्ये रूपांतर व्हावे या दिशेने वाटचाल करायला हवी.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997115)
Visitor Counter : 110