राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मेघालयच्या तुरा इथल्या बालिजेक विमानतळावर बचत गटाच्या महिलांशी साधला संवाद; तुरा इथल्या नव्या एकात्मिक प्रशासकीय संकुलाचे राष्ट्रपतींच्या हस्ते भूमिपूजन

Posted On: 16 JAN 2024 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (16 जानेवारी 2024) मेघालयातल्या तुरा इथे बालिजेक विमानतळावर स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला. तसेच, तुरा इथल्या नव्या एकात्मिक प्रशासकीय इमारतीची त्यांनी, आभासी पद्धतीने पायाभरणीही केली.

भारताला 2047 पर्यंत विकसित देश व्हायचे असेल, तर, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रात, महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे, असे यावेळी राष्ट्रपतींनी सांगितले. भारतीय महिला आज, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, शिक्षण, उद्यमशीलता, कृषी यासह प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, आणि इतर महिलांसाठी एक मार्ग तयार करून देत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. आज महिलांना केवळ प्रोत्साहन देणारे काही शब्द आणि कृती हवी आहे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप हवी आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

महिला प्रणित विकासाची कल्पना प्रत्यक्षात तेव्हाच अमलात आणता येईल, जेव्हा महिलांना त्यांच्या आवडी निवडी ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळेल, असे राष्ट्रपती पुढे म्हणाल्या. आर्थिक स्वातंत्र्यासोबत आज महिलांना थोड्याफार प्रमाणात हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आर्थिक स्वयं सहायता बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महिलांचे सक्रिय आणि मोठ्या संख्येने योगदान असावे, यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. त्यांनी लोकांना त्यांच्या सभोवतालच्या महिलांचे मूल्य आणि गुण ओळखण्यास सुरुवात करण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपतींनी स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांना पुढे जात राहण्याचे आणि इतर महिलांना पुढे नेण्यासाठी त्यांचाही हात धरण्याचे आवाहन केले. हा केवळ  काही महिलांचा प्रवास नाही तर आपल्या देशातील अशा कोट्यवधी महिलांचा प्रवास आहे, ज्यांनी अद्याप त्यांच्या घराच्या चार भिंतींच्या पलीकडे असलेल्या संधी शोधल्या नाहीत, असे सांगत, आज संधी मिळालेल्या महिला, त्यांच्या प्रदेशातील आणि देशातील इतर महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनाव्यात अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. 

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1996627) Visitor Counter : 121