रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अनुभव उत्तम करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 'एक वाहन एक फास्टॅग’ उपक्रमाचा आरंभ
अपूर्ण केवायसी असलेले फास्टॅग 31 जानेवारी 2024 नंतर बँकांद्वारे’ निष्क्रिय/काळ्या यादीत टाकले जातील
Posted On:
15 JAN 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024
इलेक्ट्रॉनिक पथकर प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि पथकर नाक्यांवर विनाअडथळा वाहतूक प्रदान करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम हाती घेतला असून अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका विशिष्ट वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडणे या वापरकर्त्याच्या वर्तनाला चाप लावण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फास्टॅग’वापरकर्त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी अपडेट करून त्यांच्या नवीनतम फास्टॅगची ‘नो युअर कस्टमर ’ (केवायसी ) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.वैध शिल्लक असलेले परंतु केवायसी अपूर्ण असलेले फास्टॅग 31 जानेवारी 2024 नंतर बँकांद्वारे निष्क्रिय/काळ्या यादीत टाकले जातील
गैरसोय टाळण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या नवीनतम फास्टॅगचे केवायसी पूर्ण केले आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.फास्टॅग वापरकर्त्यांनी ‘एक वाहन, एक फास्टॅग’ चे देखील पालन केले पाहिजे आणि संबंधित बँकांद्वारे पूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग काढून टाकावेत . मागील फास्टॅग 31 जानेवारी 2024 नंतर निष्क्रिय/काळ्या यादीत टाकले जातील त्यामुळे .केवळ नवीनतम फास्टॅग खाते सक्रिय राहील. अधिक सहाय्यासाठी किंवा शंकानिरसनासाठी फास्टॅग वापरकर्ते त्यांच्या जवळच्या पथकर नाक्यांवर किंवा संबंधित फास्टॅग जारी केलेल्या बँकांच्या टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे उल्लंघन करून केवायसीशिवाय एका विशिष्ट वाहनासाठी एकाहून अधिक फास्टॅग जारी केले जात असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उपक्रम सुरु केला आहे. याशिवाय, वाहनाच्या समोरील काचेवर काहीवेळा फास्टॅग जाणीवपूर्वक चिकटवले जात नाहीत, परिणामी पथकर नाक्यांवर अनावश्यक विलंब होतो आणि राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होते.
8 कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह, फास्टॅगने देशातील इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन प्रणालीमध्ये क्रांती केली आहे.
‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम पथकर संकलन कार्यान्वयन अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी विनाअडथळा आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यात मदत करेल.
S.Kakade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996240)
Visitor Counter : 208