अंतराळ विभाग
इस्रो ला उत्कृष्ट कामगिरी' साठीचा यंदाचा "इंडियन ऑफ द इयर पुरस्कार" प्रदान
अंतराळ संशोधन कक्षा विस्तारण्यात इस्रोने केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा या पुरस्काराने गौरव
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2024 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चमूला 'उल्लेखनीय कामगिरी' साठीचा यंदाचा "इंडियन ऑफ द इयर पुरस्कार" प्रदान केला.
एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि चांद्रयान 3 चे प्रकल्प संचालक डॉ. पी. वीरमुथुवेल यांनी नवी दिल्ली येथे एका दिमाखदार सोहोळ्यात स्वीकारला.

इस्रो ने अंतराळ संशोधनाच्या कक्षा विस्तारण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव पुरस्कार प्रशस्तिपत्रकात करण्यात आला.
“2023 हे वर्ष निःसंशयपणे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदवले जाईल, ज्या काळात भारताच्या अंतराळ संस्थेने आव्हानांचा सामना करताना अतुलनीय कुशलता आणि लवचिकता दाखवली. 2023 मध्ये इस्रोच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे चंद्राच्या अज्ञात दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर चांद्रयान-3 चे पहिले यशस्वी सॉफ्ट लँडिंग होते,” असे त्यात म्हटले आहे.

चांद्रयान-3 ही केवळ स्वदेशीच नव्हे तर केवळ 600 कोटी रुपयांची एक अतिशय किफायतशीर मोहीम असल्याचा उल्लेख डॉ जितेंद्र सिंह यांनी केला. देशात प्रतिभेची कधीच कमतरता नसली तरी वातावरण सक्षम करण्याचा हरवलेला दुवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सांधला गेला असे ते म्हणाले.

"अंतराळ तंत्रज्ञानाची "कवाडे खुली" झाल्यामुळे, देशातील सामान्य जनता चंद्रयान-3 किंवा आदित्य सारख्या भव्य अंतराळ कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहू शकल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.

प्रथमच चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरतानाच्या ऐतिहासिक क्षणाचा संपूर्ण देश साक्षीदार होता असा गौरवपूर्ण उल्लेख डॉ जितेंद्र सिंह यांनी केला.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1995352)
आगंतुक पटल : 221