वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पंतप्रधान गतिशक्ती हे जगासाठी भारताचे क्रांतिकारी देणं आहे आणि जागतिक स्तरावर पायाभूत सुविधांसाठी भविष्यातील नियोजनाचे साधन आहे - पियुष गोयल
Posted On:
10 JAN 2024 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024
पंतप्रधान गतिशक्ती हे जगासाठी भारताचे क्रांतिकारी देणं आहे अशा शब्दात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी उपक्रमाचा गौरव केला आहे. सुमारे 18 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या दूरदर्शी विचारातून त्याची सुरुवात झाली असे ते म्हणाले. गुजरातमधील गांधीनगर येथे दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 मध्ये आज आयोजित 'पंतप्रधान गतिशक्तिः सर्वांगीण विकासासाठी माहितीपूर्ण निर्णय' या विषयावरील चर्चासत्रात ते बीजभाषण करत होते. पंतप्रधान गतिशक्ती हे केवळ भारत किंवा आशियातीलच नव्हे तर जागतिक स्तरावर पायाभूत सुविधांसाठी भविष्यातील नियोजनाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. 'पंतप्रधान गतिशक्ती गुजरात सारग्रंथा' चे प्रकाशन करताना गोयल यांनी पंतप्रधान गतिशक्तीच्या महत्त्वपूर्ण परिणामांवर भर दिला.
पंतप्रधान गतिशक्तीमध्ये अंतर्भूत असलेली गतिशीलता, लवचिकता आणि तांत्रिक क्षमतेची त्यांनी प्रशंसा केली. सतत विकसित होत आहे आणि नवीन डेटा स्तरांचा समावेश करण्यासाठी अनुकूल आहे अशा भू-स्थानिक मॅपिंग आणि तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करत, प्रकल्पाचे गतिशील स्वरूप पीयूष गोयल यांनी अधोरेखित केले.
नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी जलद, अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पंतप्रधान गतिशक्तीच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा त्यांनी दाखला दिला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा हवाला देत, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या कार्यक्षम नियोजनासाठी पंतप्रधान गतिशक्तीमुळे होत असलेल्या अपार लाभांवर गोयल यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधान गतिशक्ती भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि राजकीय सीमा ओलांडून विकासाच्या संधी उपलब्ध करून देत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करत आहे असे गोयल यांनी नमूद केले.
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994990)
Visitor Counter : 106