रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वे बांधकाम नियमावली 2023 चे केले प्रकाशन
बांधकाम मॅन्युअल भूसंपादन, वनक्षेत्राची मंजुरी, पुलाचे डिझाईन, बोगद्याचे बांधकाम, यासारख्या बांधकामाशी संबंधित कामांसाठी उपयोगी ठरणार
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2024 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2024
केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे, ‘द इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन मॅन्युअल, 2023’, अर्थात भारतीय रेल्वे बांधकाम माहिती पुस्तिका 2023 चे प्रकाशन केले. माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केल्यावर उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “बांधकाम पुस्तिका भूसंपादन, वन विभागाची मंजुरी, पुलाचे डिझाईन, करार व्यवस्थापन, बोगदा बांधकाम, रस्त्यांवरील/खालील पूल अशा अनेक कामांमध्ये उपयोगी ठरेल. हे मॅन्युअल (माहिती पुस्तिका) आपल्याला जगातील सर्वात वेगाने वाढणारे रेल्वे नेटवर्क बनण्यामध्ये सहाय्य करेल.”

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “बांधकाम मॅन्युअल आता नवीन स्वरूपात आणि कालसुसंगत आहे याचा आनंद वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून, नवीन रेल्वे मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामासह रेल्वेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे, आणि या मिशनमध्ये, हे मॅन्युअल महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल कारण मॅन्युअलची मागील आवृत्ती जुनी होती (सुमारे 1960), आणि आता EPC करार, पुलांचे बांधकाम, सिग्नलिंग यंत्रणेची अंमलबजावणी, इलेक्ट्रिकल आणि नॉन-इंटरलॉकिंग कामे इ. यासारख्या नवीन सुधारणा समाविष्ट करण्यात आल्या आहेत, जे आता नवीन मॅन्युअलद्वारे प्रमाणित केले गेले आहे.”

केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य (पायाभूत सुविधा) रूप नारायण सनकर, आणि संपूर्ण टीमने ही नियमावली तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली. इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंग आणि वेगवेगळ्या विभागीय रेल्वेच्या बांधकाम अधिकाऱ्यांच्या टीमने ही नियमावली तयार केली आहे. ही नियमावली म्हणजे, बांधकाम प्रकल्प जलद गतीने कार्यान्वित करण्यासाठी बांधकाम अधिकार्यांना आवश्यक ज्ञानाने सुसज्ज करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. राष्ट्रीय रेल्वे योजनेनुसार, भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत क्षमता विकसित करणे अपेक्षित असून, ती 2050 पर्यंतच्या वाढत्या मागणीची पूर्तता करेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारतीय रेल्वेला अती महत्वाचे आणि महत्वाचे प्रकल्प सुरू करणे, नवीन मार्गांचे बांधकाम, गेज रूपांतरण, मल्टी ट्रॅकिंग, स्वयंचलित सिग्नलिंग आणि ट्रॅफिक सुविधा ई. यासारख्या आपल्या पायाभूत सुविधा उभारणीचा वेग वाढवावा लागेल. त्यामुळे बांधकाम अधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, बांधकामाच्या विविध पैलूंचा अंतर्भाव करणाऱ्या पुस्तिकेची गरज भासू लागली होती. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1994692)
आगंतुक पटल : 156