विशेष सेवा आणि लेख
भारताला महासत्ता बनवण्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची पंतप्रधानांना अपेक्षा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
09 JAN 2024 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/चेन्नई, 9 जानेवारी 2024
भारताला महासत्ता बनवण्यामध्ये प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे अशी पंतप्रधानांची अपेक्षा आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
चेन्नई येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात ते आज बोलत होते. प्रत्येक राज्य विकसित झाले पाहिजे आणि 2047 पर्यंत विकसित देश होण्याच्या भारताच्या यात्रेचा भाग झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

गोयल यांनी थोर तामिळ कवी आणि तत्त्वज्ञ थिरुवल्लूवर यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ज्यांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही अशा गरीब आणि वंचित लोकांसाठी थिरुवल्लूवर यांचा मार्ग अनुसरत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काम करत आहेत.
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांच्या जीवनात परिवर्तन घडवणे, हा केंद्र सरकारच्या गेल्या दहा वर्षातल्या कल्याणकारी धोरणांचा पाया राहिला असून देशातील लोकांमधील परस्पर बंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी विविध उपक्रमांवर सरकार काम करत आहे, असे गोयल यांनी सांगितले. काशी तामिळ संगम, सौराष्ट्र तामिळ संगम ही विविध राज्यांतील लोकांना एकमेकांची समृद्ध संस्कृती आणि वारसा समजून घेण्यास मदत करण्यासाठी सरकारने उचललेली काही पावले असल्याचे ते म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रेला तामिळनाडूमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ मिळण्यासाठी, यात्रेचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन गोयल यांनी केले.
तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होत असलेल्या योजनांबद्दल त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा 3.5 कोटी लोकांना लाभ मिळणार आहे, जन धन योजनेद्वारे 1.5 कोटी लोकांना बँकिंग प्रणालीखाली आणले गेले आहे, हर घर जल अंतर्गत एक कोटीहून अधिक कुटुंबांना नळ जोडणी मिळाली आहे, आयुष्मान भारत योजनेंतर्गत 51 लाख लोकांची नोंदणी झाली आहे, तर उज्ज्वला योजनेतून 40 लाख लोकांना लाभ मिळाला आहे.

पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, जनऔषधी केंद्रांसह 17 योजनांसोबत पंतप्रधानांची हमीदेखील लाभत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा भाग होण्यासाठी पात्र असलेल्यांना हे लाभ त्यांच्या दारात मिळतील, असे गोयल यांनी सांगितले.
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1994572)