ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारत हा मानकांचा प्रणेता असावा : पीयूष गोयल
भारतीय मानक ब्युरोने आपला 77 वा स्थापना दिवस केला साजरा
Posted On:
06 JAN 2024 2:35PM by PIB Mumbai
भारत हा मानकांचा प्रणेता असला पाहिजे, असे मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. ते आज भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या 77 व्या स्थापना दिनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करत होते. स्थापना दिनाचे औचित्य साधून भारतीय मानक ब्युरोने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्यासमवेत संयुक्तरित्या ‘भारतातील गुणवत्ता परिसंस्था प्रणाली मजबूत करण्यासाठी संवाद’ सत्र आयोजित केले होते.
भारतीय मानक ब्युरो केवळ मानकांचा अवलंब करणारा नसावा, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. जेथे शक्य असेल तेथे मानके आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत केली पाहिजेत, उदाहरणार्थ, लिफ्ट किंवा एअर फिल्टर किंवा वैद्यकीय उपकरणे. भागधारकांबरोबर सल्लामसलत करुन तसेच उद्योग प्रतिनिधींना सहभागी करून घेऊन हे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे ते म्हणाले.
गोयल यांनी दागिन्यांच्या हॉलमार्किंग संदर्भात भारतीय मानक ब्युरोने घेतलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. देशभरात 343 जिल्ह्यात दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. दररोज 4.3 लाखांहून अधिक दागिन्यांवर हॉलमार्क लावला जातो तसेच लोक खरेदी करत असलेले 90% दागिने हॉलमार्क केलेले असतात, असेही त्यांनी सांगितले.
2014 पर्यंत 106 उत्पादनांच्या केवळ 14 गुणवत्ता नियंत्रण आदेश होते. परंतु, आता 672 उत्पादनांचे 156 गुणवत्ता नियंत्रण आदेश आहेत, असे त्यांनी सांगितले.
9 वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी ‘झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट’ चा दृष्टीकोन दिला होता, ज्याचा अर्थ असा आहे की भारताने उच्च दर्जाची उत्पादने बनवली पाहिजे जी शाश्वत, पर्यावरणास अनुकूल असून त्यांचा वातावरणावर शून्य प्रभाव असावा, असे गोयल यांनी सांगितले. पंतप्रधानांची ही दूरदृष्टी अमलात आणली जात आहे, परिणामी ग्राहक वस्तूंच्या दर्जा बाबत सजग बनले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी युवा पिढीला गुणवत्ता आणि विकसित भारताचे युवा दूत बनण्याचे आवाहन केले. भारताची तरुणाई ई-लर्निंगला प्रोत्साहन देऊ शकते तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये परख उपक्रमाचा अवलंब करू शकतात.
गुणवत्तेच्या क्षेत्रातल्या त्रुटींचा अभ्यास केल्यानंतर, भारतीय मानक ब्युरो आणि उद्योगांना सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळांचे व्यापक जाळे तयार करण्यात आले असल्याचे गोयल यांनी सांगितले. अलीकडेच कापूस परीक्षणासाठी 21 प्रयोगशाळांची स्थापन करण्याच्या उद्देशाने 40 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने मान्यता दिली आहे. ज्या क्षेत्रासाठी परीक्षण आवश्यक आहे त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी उद्योग क्षेत्राला केले. भारतीय मानक ब्युरोकडे पुरेसा निधी आहे असून त्यांनी योग्य वितरणासाठी पारदर्शक परिसंस्था आणि उच्च निगराणी ठेवावी असा सल्ला गोयल यांनी दिला.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993773)
Visitor Counter : 103