माहिती आणि प्रसारण मंत्रालय

विकसित भारत संकल्प यात्रेने 10 कोटी सहभागींचा टप्पा केला पार

Posted On: 05 JAN 2024 5:45PM by PIB Mumbai

 

विकसित भारत संकल्प यात्रेने आज एक महत्वाचा टप्पा पार केला. केवळ 50 दिवसांच्या अल्प काळात यात्रेमध्ये 10 कोटींहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. ही संख्या, विकसित भारताच्या सामायिक विचाराने प्रेरित होऊन, देशभरातली लोकांना एकत्र आणण्यामधील यात्रेचा मोठा प्रभाव आणि अफाट क्षमता दर्शवते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, विकसित भारत संकल्प यात्रेतील सहभागींची संख्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या काही प्रमुख देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, विकसित भारत निर्माण करण्यासाठीचे नागरिकांचे दृढ समर्पण दर्शवितो.

अरुणाचल प्रदेशाच्या मुकुटामधील रत्न असलेल्या अन्जाव पासून, ते गुजरातच्या पश्चिम किनार्‍यावरील देवभूमी द्वारकापर्यंत, लडाखच्या बर्फाळ शिखरांपासून, ते अंदमानच्या निळ्याशार  किनार्‍यांपर्यंत, विकसित भारत संकल्प यात्रेने आता देशाच्या कानाकोपऱ्यातील समुदायांपर्यंत  पोहोचून सर्व प्रदेशांना सामावून घेतले आहे. केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळा पर्यंत पोहोचाव्यात आणि लाभार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने निघालेल्या या यात्रेने, भारताच्या विशालतेमध्ये उत्साह आणि आशेची ज्योत प्रज्ज्वलित केली आहे.

लोकसंख्येचे आकडे, स्त्रोत

15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु झाल्यापासून, 7.5 कोटींहून अधिक व्यक्तींनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचा संकल्प घेतला  आहे. ज्यामधून काही आठवड्यांच्या आत यात्रेने नागरिकांवर टाकलेला मोठा प्रभाव दिसून येत आहे.

यात्रेचा प्रभाव अभूतपूर्व असून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा आहे. यात्रेदरम्यान 1.7 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करण्यात आली असून 2.2 कोटींहून अधिक नागरिकांची आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी करण्यात आली. 7.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन, आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यात्रेदरम्यान 33 लाखांहून अधिक नवीन पीएम किसान लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. 87000 हून अधिक ड्रोन प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली असून, हे ड्रोन शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य प्रदान करतील. 

विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे केवळ एक यात्रा नसून, कृतीशील प्रयत्नांचे आवाहन आहे आणि संपूर्ण देशात त्याचा प्रतिध्वनी उमटत आहे. बदल घडवून आणण्याचा आजचा प्रयत्न उद्याच्या समृद्ध भविष्याचे वचन देत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण करणे आणि भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या उद्दिष्ट पूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी एक ठोस  संकल्प करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. विकसित भारताच्या दिशेने असलेला  हा प्रवास केवळ वैयक्तिक प्रयत्न नसून सर्व स्तरांतील लोकांचा समावेश असलेला सामुहिक प्रयत्न आहे, हे यामधून अधोरेखित होत आहे.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1993647) Visitor Counter : 121