जलशक्ती मंत्रालय
जल जीवन मिशनने 14 कोटी (72.71%) ग्रामीण कुटुंबांना नळ पाणी जोडणी प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा केला पार
जल जीवन मिशनने अतुलनीय वेग आणि व्यापक प्रमाणाचे दर्शन घडवत केवळ चार वर्षांत ग्रामीण भागातील नळ जोडणी 3 कोटींवरून 14 कोटींपर्यंत पोहोचवली
2 लाखांहून अधिक गावे आणि 161 जिल्ह्यांमध्ये आता 'हर घर जल' उपलब्ध
Posted On:
05 JAN 2024 3:35PM by PIB Mumbai
जल जीवन मिशन (जेजेम) ने आज ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी देण्याचा 14 कोटी (72.71%) चा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या भारत सरकारच्या प्रमुख उपक्रमाने अतुलनीय गती आणि व्यापक प्रमाणाचे प्रदर्शन करत ग्रामीण भागातील नळ जोडणी केवळ चार वर्षांत 3 कोटींवरून 14 कोटींपर्यंत नेली आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी ग्रामीण विकासात बदल घडवून आणणारी असून समुदायांचे सक्षमीकरण करण्यासाठी, पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या मिशनच्या वचनबद्धतेवर जोर देते.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि विविध विकास भागीदारांच्या सहकार्याने काम करत जल जीवन मिशनने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत. आजपर्यंत, गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यांनी तर पुद्दुचेरी, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली आणि अंदमान निकोबार बेटे या तीन केंद्रशासित प्रदेशांनी 100% उद्दिष्ट साध्य केले आहे. मिझोराम 98.68%, अरुणाचल प्रदेश 98.48% आणि बिहार 96.42% या प्रमाणासह नजीकच्या भविष्यात संपृक्तता प्राप्त करण्याच्या मार्गावर आहेत.
विकास भागीदारांच्या सक्रिय सहभागासह केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे परिवर्तन घडून आले आहे. या काळातील प्रत्येक क्षण नळाच्या पाण्याची जोडणी दिल्याचा साक्षीदार आहे, ज्यामुळे ग्रामीण क्षेत्रात अकल्पनीय बदल घडून आला आहे. 2 लाखांहून अधिक गावात आणि 161 जिल्हे आता ‘हर घर जल’ झाले आहेत.
जलशुद्धीकरण आणि इतर उपचार पद्धती लागू करून, जल जीवन मिशनने हे सुनिश्चित केले आहे की घरांपर्यंत पोहोचणारे पाणी मानकांची पूर्तता करणारे असेल, परिणामी जलजन्य रोग लक्षणीयरीत्या कमी होतील आणि ग्रामीण भागातील लोकांचे एकंदरीत आरोग्य सुधारेल.
घरगुती जोडण्यांव्यतिरिक्त, जल जीवन मिशनने देशभरातील 9.24 लाख (90.65%) शाळा आणि 9.57 लाख (86.63%) अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे पाण्याचा पुरवठा सुनिश्चित केला आहे. उपक्रमाच्या प्रारंभी 112 आकांक्षी जिल्ह्यांमध्ये नळाद्वारे पाण्याची सुविधा 21.41 लाख (7.86%) कुटुंबापर्यंत पोहचत होती, ज्यात आता वाढ होऊन ती 1.96 कोटी (72.08%) कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे.
'हर घर जल' उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेला, विशेषत: स्त्रिया आणि तरुण मुलींची दररोज पाणी आणण्याच्या कठीण कामातून सुटका झाली असून सर्वांना भरीव सामाजिक-आर्थिक फायदे मिळत आहेत. या लोकांचा वाचवलेला हा वेळ आता त्यांना अधिक अर्थार्जन उपक्रम, कौशल्य विकास आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी वापरता येत आहे.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या तत्त्वाचा अवलंब करून जल जीवन मिशन सर्वांना सुरक्षित आणि परवडणारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या शाश्वत विकास ध्येय 6 च्या पूर्तीसाठी सातत्याने वाटचाल करत आहे. ग्रामीण भागातील सर्व घरे, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक संस्थांना नळांद्वारे सुरक्षित पाणी पोहोचवण्याची जल जीवन मिशनची वचनबद्धता विकसित भारतच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993609)
Visitor Counter : 187