कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
उदयोन्मुख आणि भविष्यातील ई-प्रशासन उपक्रम, ई-कॉमर्स उपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर विचारमंथन सत्राचे आयोजन
या क्षेत्रातील तज्ञांनी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता आराखड्यावर आधारित भविष्यातील सार्वजनिक सेवा वितरण मॉडेल्सची दिली माहिती
नव्या पिढीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जोखीम आणि ओळख व्यवस्थापन तसेच नागरिकांची गोपनीयता, डेटा सुरक्षा आणि वर्धित सायबर-सुरक्षा उपायांवर लक्ष केंद्रित
ई-प्रशासन उपक्रमांमध्ये भाषिणी , सर्व्हिस प्लस इत्यादींचा वाढीव वापर
Posted On:
05 JAN 2024 12:28PM by PIB Mumbai
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने 4 जानेवारी 2024 रोजी नागरी सेवा अधिकारी संस्था कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली येथे उदयोन्मुख आणि भविष्यातील ई-प्रशासन उपक्रम, ई-कॉमर्स उपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर एका विचारमंथन सत्राचे आयोजन केले होते.
ई-सेवा वितरण, ई-गव्हर्नन्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अंमलबजावणी या क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या भागधारकांमधील ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. डेलॉइट, पीडब्ल्यूसी, प्राइमस पार्टनर्स, केपीएमजी, क्यूसीआय आणि ईवाय या प्रमुख संस्थांमधील 15 कार्यक्षेत्रातील तज्ञ आणि प्रतिष्ठित प्रतिनिधींनीसह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सत्राला हजेरी लावली.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी सत्राचा विषय मांडून चर्चेला प्रारंभ केला. राष्ट्रीय ई प्रशासन सेवा वितरण (NeSDA) वे फॉरवर्ड नोव्हेंबर, 2023 च्या अहवालात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून 1574 अनिवार्य ई-सेवा वितरणाचा उल्लेख करत गेल्या काही वर्षांत देशभरात ई-सेवा वितरणाची कक्षा कशी रुंदावली आहे याची माहिती व्ही. श्रीनिवास यांनी दिली, तर या तुलनेत राष्ट्रीय ई प्रशासन सेवा वितरण वे फॉरवर्ड (NeSDA) 2019 च्या अहवालात केवळ 872 सेवा उपलब्ध असल्याचा अहवाल दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय ई प्रशासन सेवा वितरण (NESDA) वे फॉरवर्डमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 16088 ई-सेवांची नोंद करण्यात आली आहे जी एप्रिल 2023 मध्ये 11,614 होती, असे ही व्ही. श्रीनिवास यांनी सांगितले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ई- सेवा मिळविण्यासाठी एकच थांबा म्हणून सेवा वितरणाचा केंद्रित दृष्टिकोन युनिफाइड सर्व्हिस पोर्टल्सकडे कसा स्थलांतरित केला यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच काही राज्यांनी या मानकावर 100% संपृक्ततेची पातळी या आधीच गाठली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर, ई प्रशासन धोरण कार्य क्षेत्रातील तज्ञांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानासह ई-गव्हर्नन्स आणि ई-कॉमर्सची उपलब्धी, उदयोन्मुख परिस्थिती आणि भविष्यातील दिशा यावर प्रकाश टाकला आणि काही जागतिक सर्वोत्तम पद्धतीच्या केस स्टडी सामायिक केल्या.
उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. पीडब्ल्यूसी चे भागीदार संतोष मिश्रा यांनी नव्या पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता आराखडा तयार करुन ई सेवा सर्वसमावेशक बनवावी या संदर्भात चर्चा केली.
डेलॉइट चे भागीदार एनएसएन मूर्ती यांनी नव्या पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्ता वैयक्तिकृत अनुभव कसा सक्षम करू शकते, वितरणाचे सर्वोत्तमीकरण, नाविन्यपूर्ण उपायांद्वारे निर्णय घेण्यास सक्षम करणे यावर चर्चा केली.
प्राइमस पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलय वर्मा यांनी प्रभावी सेवा वितरणाची गुरुकिल्ली म्हणजे केवळ तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित न करता सेवांवर लक्ष केंद्रित करणे असल्याचे सांगितले. माहिती व्यवस्थापन, सेवेची हमी आणि वापरकर्त्याची गोपनीयता राखण्याव्यतिरिक्त - नागरिक ओळख व्यवस्थापन आणि कुटुंब एक घटक म्हणून सेवा वितरण यामुळे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात यावर वर्मा यांनी भर दिला.
चंदन के सिंग आणि सुभदीप बिस्वास यांच्या केपीएमजी चमूने नव्या पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील सेवा वितरणाचे भविष्यात नेतृत्व करेल यावर भर दिला. त्यांनी भविष्यातील अपेक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गावर चर्चा केली, ज्यामध्ये उदयोन्मुख कल आणि सरकारांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात हाताळावी लागणारी आव्हाने यांचा समावेश आहे. क्यूसीआयचे वरिष्ठ संचालक आर.एन. शुक्ला यांनी ई-कॉमर्स क्षेत्राविषयी चर्चा केली आणि जीवन-चक्र दृष्टिकोनावर आधारित एकात्मिक सेवा वितरण मंच तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. ईवाय चे अनुराग दुआ यांनी माहिती मानकीकरण शिष्टाचारावर प्रकाश टाकला आणि खर्च आराखडा तयार करून आर्थिक प्रगती आणि परिणामांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग आखण्याची गरज स्पष्ट करुन सत्राचा समारोप केला:
- सेवा वितरणाच्या सुलभीकरणासाठी सार्वत्रिक चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियांचा प्रचार.
- ई-प्रशासन उपक्रमांमध्ये भाषिणी, सर्व्हिस प्लस इत्यादींचा समावेश.
- अनिवार्य ई-सेवा 160 पेक्षा जास्त वाढवण्याची अफाट क्षमता.
- ई-ऑफिस विश्लेषण आणि सायबर-सुरक्षा उपायांवर लक्ष केंद्रित करणे.
- तक्रार निवारणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर.
- तंत्रज्ञानाचा वापर करून, एक घटक म्हणून कुटुंबांपर्यंत पोहोचणे.
- ई-कॉमर्स उपक्रमांवर भर
- सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करण्यासाठी मजबूत प्रसार माध्यम संपर्क.
- राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारचे सहकार्य
- नव्या पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी हॅकाथॉनची गरज.
या सत्राने प्रशासकीय सुधारणांसाठी आणि डिजिटल परिवर्तनाच्या परिवेशाला योग्य आकार देण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, यशोगाथा आणि धडे सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.
***
NM/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993538)
Visitor Counter : 98