वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतीय खेळणी उद्योगाने आयातीत 52% घट आणि निर्यातीत 239% वाढ नोंदवली
Posted On:
04 JAN 2024 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2024
भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239% ने वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या खेळण्यांच्या एकंदरीतच दर्जात सुधारणा झाली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या विनंतीवरून, भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) लखनौ द्वारे केलेल्या “स्वदेशी खेळण्यांची यशोगाथा” या विषयावरील विशिष्ट अभ्यासामध्ये ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय खेळणी उद्योगासाठी, अधिक पोषक उत्पादन व्यवस्था निर्माण करण्यात मदत झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2014 ते 2020 या 6 वर्षांच्या कालावधीत, या समर्पित प्रयत्नांमुळे उत्पादन कंपन्यांची संख्या दुप्पट झाली आहे, आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या मालावरील अवलंबित्व 33% वरून 12% पर्यंत कमी झाले आहे, एकूण विक्री मूल्यात 10 च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धीदराने (सीएजीआर) वाढ झाली आहे आणि एकंदर श्रम उत्पादकतेत वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशांतर्गत उत्पादित खेळण्यांसाठी संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासह शून्य-शुल्क बाजार प्रवेशासह जागतिक खेळणी मूल्य साखळीत देश एकीकृत झाल्यामुळे भारत सर्वोच्च निर्यातदार राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, असे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. जगातील सध्याच्या खेळण्यांचे केंद्र, म्हणजे चीन आणि व्हिएतनामसाठी भारताला एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थान देण्यासाठी, तंत्रज्ञानातील प्रगती, ई-वाणिज्यचा अवलंब, भागीदारी आणि निर्यातीला प्रोत्साहन , ब्रँड-उभारणीमध्ये गुंतवणूक करणे, शिक्षक आणि पालकांचा मुलांशी संवाद, सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि प्रादेशिक कारागिरांसह सहयोग यांसारखे सातत्यपूर्ण सहयोगात्मक प्रयत्न खेळणी उद्योग आणि सरकारकडून केले जाणे आवश्यक आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या मुद्द्यांवर काम करण्यासाठी आणि भारतीय खेळणी उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी, धोरणात्मक कृती आराखडा आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने, सरकारने आधीच एनएपीटी अंतर्गत उपाययोजना सुरू/ हाती घेतल्या आहेत.
देशांतर्गत उत्पादकांच्या प्रयत्नांसह सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे भारतीय खेळणी उद्योगाची उल्लेखनीय वाढ झाली आहे.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993177)
Visitor Counter : 188