सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
असाधारण प्रतिभेचे दर्शन-'दिव्य कला शक्ती "सांस्कृतिक कार्यक्रमाने दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभेवर टाकला प्रकाशझोत
Posted On:
03 JAN 2024 12:47PM by PIB Mumbai
गुजरातमधल्या अहमदाबाद येथील संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सक्षमीकरण विभागाने अहमदाबादमधील प्रसिद्ध श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहामध्ये 'दिव्य कला शक्ती' हा नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
केंद्रीय प्रादेशिक केंद्राने आयोजित केलेल्या या अनोख्या प्रदर्शनात दिव्यांग व्यक्तींच्या अव्यक्त प्रतिभेवर प्रकाश टाकण्यात आला आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सर्जनशील जगाचे दर्शन घडवण्यात आले. या कार्यक्रमात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दादरा- नगर हवेली आणि दमण- दीव येथील सहभागी झालेल्या एकूण 100 दिव्यांग व्यक्तींनी मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणात महत्वाची भूमिका बजावली.
समूह नृत्यांपासून ते चित्तवेधक एकल सादरीकरणांपर्यंत, मधुर सामूहिक गाण्यांपासून ते मंत्रमुग्ध करणारी एकल सादरीकरणे आणि विस्मयकारक विशेष कला प्रदर्शन असलेला-'दिव्य कला शक्ती' हा कार्यक्रम सहभागींच्या उल्लेखनीय क्षमतेचा पुरावा होता.
केन्द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणसामी आणि अहमदाबादचे माजी खासदार हसमुख भाई सोमाभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित होते.
या सायंकाळचे ठळक वैशिष्ट्य ठरला तो सत्कार समारंभ. यावेळी सहभागींना त्यांच्या असामान्य प्रतिभेसाठी कौतुक म्हणून एकूण 3,00,000 रुपयांचे धनादेश देण्यात आले. केवळ त्यांच्या कलात्मक कर्तृत्वाची दखलच घेतली नाही तर विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
'दिव्य कला शक्ती' हा प्रेरणा देणारा, अडथळे दूर करणारा आणि प्रत्येक व्यक्तीतील अमर्याद क्षमता दाखवणारा दीपस्तंभ आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच केले नाही तर प्रेक्षकांची मनेही समृद्ध केली. यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रतिभांबद्दलची सखोल समज आणि त्यांच्या बद्दलचे कौतुक अपार वाढले.
***
NM/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1992674)
Visitor Counter : 141