गृह मंत्रालय

पंडित जसराज संगीत महोत्सव- पंडित मोतीराम पंडित मणिराम संगीत महोत्सवाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा हस्ते आज नवी दिल्ली येथे टपाल तिकिटाचे प्रकाशन


भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीताला नवी उंची प्राप्त करून देण्‍यामध्‍ये पंडितजींचे अविस्मरणीय योगदान

Posted On: 27 DEC 2023 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा हस्ते  आज नवी दिल्ली येथे पंडित जसराज संगीत महोत्सव- पंडित मोतीराम पंडित मणिराम संगीत महोत्सवाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्‍या निमित्त एका  टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्‍यात आले.

या कार्यक्रमात बोलताना अमित शहा  म्हणाले की, पंडित जसराज यांनी आठ दशकांपेक्षाही जास्‍त काळ भारतीय शास्त्रीय, वैष्‍णव परंपरेतील भक्ती पदांनी संपूर्ण जगातील संगीतप्रेमींना तृप्त केले. पंडित जसराज श्रीकृष्‍णावरील अष्‍टसखा हे भजन इतक्या भक्तिभावाने तल्लीन होवून गायचे की, त्यामुळे  भगवान श्रीकृष्णाची प्रतिमाच जणू रसिकांच्या डोळ्यासमोर उभी रहात असे. गृहमंत्री म्हणाले की, पंडित जसराज यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्तिपदाला नव्या उंचीवर नेले आणि त्यामुळेच जगभरातील लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. यावेळी  शहा  म्हणाले की, भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत लोकप्रिय बनविण्‍यासाठी  त्यांचे योगदान भारत कधीही विसरू शकत नाही. ते म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री  शहा  पुढे म्हणाले की, भारत सरकारकडून  देण्यात आलेल्या या  सन्मानामुळे पंडित जसराज यांचे चाहते  त्यांच्या आठवणींना उजाळा देतील.

या संगीत महोत्सवाचा प्रारंभ पंडित जसराज यांनी 1972 मध्‍ये आपले पिता, संगीत रत्न पंडित मोतीराम आणि त्‍यांचे वडिल बंधू संगीत महामहोपाध्‍याय पंडित मणिराम जी यांच्‍या स्‍मृतीप्रीत्यर्थ सुरू केला.

कालातीत  महान  भारतीय शास्त्रीय गायकांपैकी एक  असणारे, पंडित जसराज जी  यांनी भारताच्या  संस्कृती आणि संगीताच्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. हैदराबादमधील  श्रोत्यांनाही त्यांनी  तरुण संगीतकारांचा परिचय करून दिला.  

पंडित जसराज जींनी आपल्या आयुष्‍यामध्‍ये  सलग 47 वर्षे, या वार्षिक संगीत समारंभाचे स्वतः आयोजन केले.

या टपाल तिकीटाच्या प्रकाशन समारंभाला  पंडित जसराज यांच्या कन्या  दुर्गा जसराज आणि पंडित मणिराम जी यांचे पुत्र आणि पंडित मोतीराम जी यांचे नातू पंडित दिनेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  


 

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1991062) Visitor Counter : 83