संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत स्टेल्थ गाईडेड मिसाईल विनाशिका आयएनएस इंफाळचा नौदलात समावेश; ‘इंफाळ’ संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’ चे प्रतीक असल्याचे काढले गौरवोद्गार
हिंद-प्रशांत क्षेत्रात ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ (समुद्रावर नियंत्रण मिळवतो तो सर्वशक्तिमान) या आमच्या तत्त्वाला आयएनएस इंफाळ बळ देईल : राजनाथ सिंह
Posted On:
26 DEC 2023 2:40PM by PIB Mumbai
आयएनएस इंफाळ ही प्रोजेक्ट 15B स्टेल्थ गाईडेड मिसाईल विनाशिका 26 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतील नौदल गोदी येथे आयोजित एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. नौदलात दाखल चार स्वदेशी 'विशाखापट्टणम' श्रेणीतील विनाशिकांपैकी तिसरी विनाशिका भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने डिझाइन केली असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल ), मुंबई यांनी ती तयार केली आहे.
या प्रसंगी बोलताना संरक्षण मंत्र्यांनी आयएनएस इंफाळचे वर्णन संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’ चे एक दिमाखदार उदाहरण आणि भारतीय नौदल, एमडीएल आणि इतर संबंधितांच्या राष्ट्रीय सुरक्षेप्रति वचनबद्धतेचे प्रतिबिंब असे केले. “आयएनएस इंफाळ हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि ते आणखी मजबूत करेल. हिंद-प्रशांत क्षेत्रात ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ (समुद्रावर नियंत्रण मिळवतो तो सर्वशक्तिमान) या आमच्या तत्त्वाला आयएनएस इंफाळ बळ देईल ” असे ते म्हणाले.
या जहाजाची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे आणि भारतात निर्मित सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी ही एक आहे. या विनाशिकेला एकत्रित गॅस आणि गॅस कॉन्फिगरेशनमध्ये चार शक्तिशाली गॅस टर्बाइन्सद्वारे ताकद देण्यात आली आहे आणि टिचझ वेग 30 सागरी मैलांपेक्षा अधिक आहे.
अरबी समुद्रात मालवाहतूक जहाज (एमव्ही) केम प्लूटोवर अलीकडेच झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्याचा आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साई बाबा' जहाजावर झालेल्या हल्ल्याचाही संरक्षण मंत्र्यांनी उल्लेख केला. भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याने काही शक्तींना ईर्ष्या आणि द्वेष वाटत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारत सरकारने हे हल्ले अतिशय गांभीर्याने घेतले असून नौदलाने गस्त वाढवली आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाच्या अतुलनीय वचनबद्धतेचे एक तेजस्वी प्रतीक असल्याचा गौरव आयएनएस इंफाळला प्राप्त झाला आहे, असे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. आयएनएस इंफाळ राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणाऱ्या विविध मनसुब्यांना रोखेल. शत्रूला नेस्तनाबूत करेल आणि प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय निग्रह दाखवेल.”, असे ते म्हणाले.
एखाद्या ईशान्य भारतातील शहराच्या नावाने नामकरण करण्यात आलेली आयएनएस इंफाळ ही पहिलीच युद्धनौका असून हा अनोखा गौरव या या युद्धनौकेला प्राप्त झाला आहे. ज्याने राष्ट्र आणि भारतीय नौदलासाठी या प्रदेशाचे आणि मणिपूरचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित केले आहे. ही युद्धनौका नौदलात सहभागी होण्यापूर्वी विस्तारित श्रेणीच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली,यामुळे ही युद्धनौका ‘शस्त्र-सज्ज ’ झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि संचालक (वित्त) आणि अतिरिक्त प्रभार असलेले एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल हे या समारंभाला उपस्थित होते. तोफखाना आणि क्षेपणास्त्र तज्ञ कॅप्टन के.के. चौधरी यांचे नेतृत्वाखाली या युद्धनौकेत एकूण 315 कर्मचारी आहेत ही युद्धनौका देशाच्या सागरी सुरक्षा आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी नौदलाची गतिशीलता, पोहोच आणि लवचिकता वाढवेल.
***
S.Bedekar/S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1990474)
Visitor Counter : 172