ग्रामीण विकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत ‘पाणलोट प्रकल्पांमध्ये हरित अर्थव्यवस्थेसाठी निवडुंग’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला केले संबोधित

Posted On: 23 DEC 2023 4:39PM by PIB Mumbai


नवी दिल्ली 23 डिसेंबर 2023


केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी दिल्ली येथे दूरदृश्य प्रणालीमार्फत ‘पाणलोट प्रकल्पांमध्ये हरित अर्थव्यवस्थेसाठी निवडुंग’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित केले. निवडुंग लागवडीला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भूसंपदा विभागाने “पाणलोट प्रकल्पांमध्ये हरित अर्थव्यवस्थेसाठी निवडुंग’” या विषयावर ही एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सर्व प्रतिनिधींना या संधीचा उपयोग करून निवडुंग लागवड आणि त्याच्या आर्थिक उपयोगावर आधारित परिसंस्था अस्तित्वात आणण्याचे आवाहन केले.

केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय आंतरशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने (NIIST) कार्यशाळेच्या ठिकाणी निवडुंगाच्या सालीपासून तयार केलेली पादत्राणे, बॅग, जॅकेट, बुट अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनात निवडुंगाच्या फळापासून तयार केलेला रस आणि निवडुंगापासून बनवलेले सलाड देखील सर्व प्रतिनिधींना देण्यात आले.

या कार्यशाळेत 15 राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 200 प्रतिनिधी, केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अन्न प्रक्रिया, संबंधित उद्योगांचे प्रतिनिधी तसेच इतर नामांकित संशोधन संस्थांनी भाग घेतला. या कार्यशाळेत प्रतिनिधींनी निवडुंग लागवडीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली तसेच निवडुंगाचे आर्थिक आणि पर्यावरणीय उपयोग जसे की कॉम्प्रेस्ड बायो-गॅस, जैविक खते, चारा, अन्न अशी उत्पादने तसेच औषध निर्माण क्षेत्रातील फायदे, कार्बन क्रेडिट याबाबतही चर्चा केली. सहभागी राज्यांनी आपापल्या राज्यात निवडुंगाची लागवड करण्यासाठीची प्रारंभिक योजना देखील सादर केली. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या उद्योग प्रतिनिधींनी भूसंपदा विभागाच्या (DoLR) प्रयत्नांचे कौतुक केले तसेच निवडुंग लागवड आणि निवडुंग आधारित उद्योगांना चालना देण्यासाठीच्या उपक्रमाबाबत उत्सुकता व्यक्त केली.

 
M.Pange/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 



(Release ID: 1989912) Visitor Counter : 83


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil