आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
INSACOG द्वारे सुरू असलेल्या नियमित निरीक्षणात केरळमध्ये आढळला JN.1 हा कोविड 19 च्या विषाणूचा उपप्रकार.
Posted On:
16 DEC 2023 7:14PM by PIB Mumbai
केरळमध्ये भारतीय सार्स - सीओव्ही -2 जनुकीय अभ्यास समूह (INSACOG) द्वारे चालू असलेल्या नियमित देखरेखी दरम्यान, कोविड 19 च्या JN.1 उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी आज नवी दिल्ली येथे ही माहिती दिली.
भारतीय सार्स - सीओव्ही -2 जनुकीय अभ्यास समूह (INSACOG) ही जनुकीय नमुने अभ्यास प्रयोगशाळांची साखळी असून ती भारतात जनुकीय अभ्यास दृष्टिकोनातून कोविड-19 चे निरीक्षण करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या समूहाचा एक भाग आहे. कोविड -19 च्या संदर्भात निरिक्षण ठेवण्याच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इन्फ्लूएंझा सारखे आजार (ILI) आणि SARI च्या रूग्णांची कोविड-19 साठी चाचणी केली जाते आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने संपूर्ण जनुकीय अनुक्रम (WGS) साठी पाठवले जातात.
8 डिसेंबर 2023 रोजी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील काराकुलममध्ये आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह नमुन्यात हे प्रकरण आढळून आले. 18 नोव्हेंबर 2023 रोजी या नमुन्याची आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह चाचणी करण्यात आली होती. रुग्णाला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती आणि तो रुग्ण कोविड-19 मधून बरा झाला होता.
गेल्या काही आठवड्यांपासून केरळ राज्यामध्ये कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ हे याचे कारण आहे. यापैकी बहुतेक रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे आहेत आणि हे रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय त्यांच्या घरीच स्वतःहून बरे होत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित सरावाचा एक भाग म्हणून, सध्या राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये, त्यांच्या सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेच्या उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी एक मॉक ड्रिल सुरू आहे. 13 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सराव जिल्हाधिकाऱ्यांच्या संपूर्ण देखरेखीखाली केला जात असून 18 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय केरळ राज्याच्या आरोग्य विभागाच्या नियमित संपर्कात आहे आणि तिथे येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवत आहे.
***
S.Kane/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987280)
Visitor Counter : 163